मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठीच्या निविदेला प्रतिसाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:14 AM2021-04-06T04:14:41+5:302021-04-06T04:14:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव- शहरात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना, दुसरीकडे शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत ...

Mokat has not responded to the tender for neutering of dogs | मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठीच्या निविदेला प्रतिसाद नाही

मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठीच्या निविदेला प्रतिसाद नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव- शहरात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना, दुसरीकडे शहरात मोकाट कुत्र्यांची समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही महासभा मध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गाजल्यानंतर महापालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांवर निर्बिजीकरण करण्यासाठी निविदा काढली होती. मात्र या निविदेला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने पुन्हा मुदतवाढ दिली असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी पवन पाटील यांनी दिली आहे.

शहरात गेल्या वर्षभरात मोकाट कुत्र्यांची समस्या अतिशय भीषण होत आहे. शहरात सद्यस्थितीत वीस हजारांहून अधिक मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. शहरातील अनेक भागात रात्रीच्या वेळेस नागरिकांना फिरणे देखील कठीण झाले आहे. मोकाट कुत्र्यांचा झुंडीच्या झुंडी नागरिकांवर हल्ला करत असल्याचे चित्र देखील अनेक भागात पाहायला मिळते. महापालिका प्रशासनाकडे शहरातील मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यात यावा यासाठी शहरातील नागरिक व अनेक सामाजिक संघटनांकडून सातत्याने निवेदने देण्यात येत आहेत. तसेच स्थायी समितीच्या सभेत देखील मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर विरोधकांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर गेल्या महिन्यात महापालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांवर निर्बिजीकरण करण्यासाठी निविदा काढली होती. मात्र निविदेला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे महापालिकेने या निर्णयाला पुन्हा मुदतवाढ दिली आहे.

तीन वर्षांच्या करारासाठी काढली निविदा

गेल्या वेळेस देखील महापालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाला नव्हता. अनेक निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर अमरावती येथील एका संस्थेला निर्बिजीकरण करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र केंद्र सरकारच्या ॲनिमल वेल्फेअर संघटनेने यावर आक्षेप घेतल्यामुळे या संस्थेचे काम थांबविण्यात आले आहे. आता महापालिकेने तब्बल तीन वर्षांसाठी ही निविदा प्रक्रिया राबवली आहे. १ कोटी ८० लाख रुपयांची ही निविदा प्रक्रिया असून, शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. यासाठी संस्थेला निर्बिजीकरण करण्यासाठी स्वतंत्र डॉग रूम तयार करावा लागणार आहे. दरम्यान, वर्षभरात शहरातील पाचशेहून अधिक नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामध्ये एका मुलाचा देखील मृत्यू झाला होता.

Web Title: Mokat has not responded to the tender for neutering of dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.