मठगव्हाण येथे हाणामारीसह अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:35 PM2019-03-15T23:35:30+5:302019-03-15T23:35:45+5:30
पीडित मुलीसह वडील व भावाला मारहाण
अमळनेर : मठगव्हाण येथे पालखी मिरवणुकीत नृत्य करीत असताना अल्पवयीन तरुणीला धक्का मारल्याच्या कारणावरून दंगल उफाळून तरुणीचा विनयभंग केल्याची घटना १४ रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. या प्रकरणी पोलिसात दंगल, विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आले तर चार फरार झाले आहेत.
पोसीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील मठगव्हान येथे १४ रोजी दिंडी व पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. सायंकाळी ७ वाजता एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या घरासमोर मिरवणूक आली असता ती मुलगीही मिरवणुकीत नाचत होती. त्यावेळी नितीन महेश पवार याने तिचा डावा हात धरत तिला बाजूला नेले व तिच्याशी असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला. त्याचवेळी मुलीचे वडील विचारणा करायला गेले असता सोनू दिलभर पवार, महेश आसाराम पवार, बापू आसाराम पवार यांनी मुलीच्या वडिलांना लाथा बुक्क्यांंनी मारहाण केली तर अरविंद कृष्णकांत पवार, विशाल शिवाजी पवार यांनी त्या तरुणीच्या घरात घुसून तरुणी व तिच्या भावालाही मारहाण करून शिवीगाळ केली.
तरुणीने रात्री उशिरा अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून नितीन पवार, अरविंद पवार, विशाल पवार, सोनू पवार, महेश पवार, बापू पवार या सहा जणांविरुद्ध भादंवि कलम ३५४ ब प्रमाणे विनयभंग, ४४८, १४३, १४७, ३२३ प्रमाणे दंगल मारहाण, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी तर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनू पवार व महेश पवार यांना अटक करण्यात आली असून उर्वरित चार जण फरार झाले आहेत. तपास उपनिरीक्षक चंद्रकांत चातुरे करीत आहेत.