सोमवार ‘कडकडीत बंद’साठी व्यापारी पुढाकार घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 11:28 PM2021-02-18T23:28:09+5:302021-02-18T23:29:03+5:30
पारोळा शहरात व्यापाऱ्यांनी सोमवारी कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पारोळा : शहरासह तालुक्यात कोरोनाने डोके वर काढले असल्याने वाढत्या रुग्णांची संख्या बघता दर सोमवारी बाजारपेठेसह महामार्गावरील सर्व दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्याच्या यावा, अशी हाक नगराध्यक्ष करण पाटील यांनी दिली. त्यावर पालिका सभागृहात लहान मोठे सर्व व्यापारी, नागरिक, पालिका व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त बैठक घेऊन या बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत दर सोमवारी बंद पाळण्यात यावा यासाठी संमती दिली.
नगरपालिका सभागृहात दिनांक १८ रोजी संध्याकाळी ५ वाजता व्यापाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार नगरपालिका व व्यापारी वर्गाचे दर सोमवारी मुख्य बाजारपेठ, महामार्गावरील दुकाने बंद ठेवण्याबाबत एकमत झाले. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश गायकवाड, नगरसेवक पी.जी. पाटील, मनीष पाटील, संजय पाटील, गौरव बडगुजर उपस्थित होते. उपनगराध्यक्ष दीपक अनुष्ठान यांनी भाजीपाला विक्रेत्यांनी सोमवारी लिलाव लावू नये. उरलेला माल सोमवारी विक्री करू नये, अशा सूचना करून जर माल उरलेला असेल, तर तो माल गल्ली बोळात विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
बैठकीस व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष केशव क्षत्रिय, अशोक ललवाणी, विलास वाणी, अरुण वाणी, महेश हिंदुजा, दिनेश गुजराथी,संजय कासार,धर्मेंद्र हिंदुजा,सुनील भालेराव, अमोल वाणी यांच्यासह किराणा, कापड, विक्रेते, व्यापारी उपस्थित होते.
...तर दंडात्मक कारवाई अटळ
बैठकीला मार्गदर्शन करताना कर निरीक्षक संदीप साळुंखे यांनी सांगितले की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क लावणे आवश्यक आहे.व त्यासाठी एक दिवस कडकडीत बंद पाळणे गरजेचे आहे. सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. त्यातून दवाखाने, मेडिकल व भोजनालय यांना ‘बंद’मधून सूट देण्यात आली आहे. दूध डेअरी यांना सकाळी ३ तास व संध्याकाळी ३ तास असा वेळ देण्यात आला आहे. जे व्यापारी निर्णय मान्य करणार नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पहिल्या वेळी ५००रुपये, दुसऱ्या वेळी २००० रुपये व तिसऱ्या वेळी ५००० रुपये व दुकानाला सील लावण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.