यावल येथे मान्सूनपूर्व आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 07:19 PM2019-05-17T19:19:57+5:302019-05-17T19:20:55+5:30
यावल तालुक्यात पावसाळ्यापूर्वी व पावसाळयात नैसर्गिक संकटे उद्भवण्याची शक्यता असते. त्यावरील उपाययोजना करण्यासाठी शासकीय यंत्रणेने तत्पर राहण्यासाठी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक झाली.
यावल, जि.जळगाव : तालुक्यात पावसाळ्यापूर्वी व पावसाळयात नैसर्गिक संकटे उद्भवण्याची शक्यता असते. त्यावरील उपाययोजना करण्यासाठी शासकीय यंत्रणेने तत्पर राहण्यासाठी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बैठक झाली. बैठकीत सबंधित सर्व शासकीय यंत्रणेस दक्ष राहण्याच्या कडक सूचना देण्यात आल्यात.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी तालुक्यात चक्रीवादळ, पाऊस, वीज पडणे व पावसाळ्यात पूरजन्य स्थिती तसेच अति वृष्टीमुळे रहिवाशी भागाचे व शेतीचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यावरील उपाययोजना करण्यासाठी प्रांताधिकारी डॉ.थोरबोले यांनी येथील तहसीलदारांच्या दालनात उपस्थित यंत्रणेस सूचना केल्या.
तालुक्यातील नद्या, नाले यामधील वाळू उपशामुळे निर्माण झालेले खड्डे पावसाळयात भरल्याने तसेच पुरामुळे नदीकाठावरील रहिवाशांंना धोका पोहचू नये म्हणून ग्रामीण भागात ग्रामसेवक, तलाठी तसेच शहरी भागात नगरपालिकेने रहिवाशांना सावधानतेचा इशारा देणे, वादळामुळे रस्त्यावरील झाडे पडली असता त्यांना तत्परतेने बाजुला सारून यासह संकटकाळात यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिल्या आहेत. साथजन्य स्थिती उद्भवू नये किंवा उद्भवल्यास आरोग्य विभागास तत्पर राहण्याच्या सूचना केल्या आहेत. नदीकाठावरील गावामधील पोहणाऱ्यांची यादी तयार करणे आदी सूचना डॉ.थोरबोले यांनी यंत्रणेस दिल्या आहेत.
बैठकीस निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, गटविकास अधिकारी किशोर सपकाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बºहाटे यासह फैजपूर, यावल नगरपालिकेचे प्रतिनिधी यांच्यासह संबंधित यंत्रणेचे प्रतिनिधी उपस्थित होते.