एक महिन्यानंतर 'पंढाय मा पाणी...!'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 12:15 IST2021-08-17T12:14:13+5:302021-08-17T12:15:37+5:30
जवळपास एक महिन्याच्या अंतराने पाऊस झाला.

एक महिन्यानंतर 'पंढाय मा पाणी...!'
संजय हिरे
खेडगाव, ता. भडगाव : सोमवारी रात्री मघा नक्षत्र लागले. या भागात मंगळवारी पहाटे जवळजवळ एक महिन्यानंतर पाऊस झाला. धाबे घराला, छताला लावलेले पंढाय (पाईप किंवा पाणी निघण्यासाठीचे पत्री पन्हाळ) मधून पावसाचे पाणी वाहताना पाहून वृध्द व जुन्या मंडळींनी एकदावना पंढाय लागनात..., असे म्हणत आनंद व्यक्त केला.
ग्रामीण भागात मातीच्या धाब्याचे, सिमेंट स्लॅबच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी निघून जाण्यासाठी पूर्वी पत्र्यापासून तयार केलेली आयताकृती पन्हाळी व आता पीव्हीसी पाईप जोडतात. त्यास खानदेशात पंढाय म्हणतात. याची ओळख शहरातील नवीन पिढीला नसली तरी खेड्यापाड्यात 'पंढाय' हा शब्द प्रचलित आहे.
पडणाऱ्या पावसाचे पाणी अशा 'पंढाय'मधून वाहू लागले म्हणजे पंढाय लागनात, असा चांगल्या पावसाची वार्ता नातेवाईक, दूरच्या मंडळींना आजही भ्रमणध्वनी, लॅण्डलाईन फोनवरुन दिली जाते. पूर्वी मातीचे धाबे असत. पावसाचे पाणी धाब्यावर, छतावर पडून माती चांगली भिजली व पंढाय वाहण्या योग्य पाऊस झाला म्हणजे शेतातील पिकांची तहान भागली अशी धारणा या मागे होती.