श्रावण महिन्याने दिला शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:21 AM2021-08-25T04:21:13+5:302021-08-25T04:21:13+5:30
कजगाव, ता. भडगाव : दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा मोठा चिंतेत सापडला होता. मात्र, पावसाने गेल्या ...
कजगाव, ता. भडगाव : दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजा मोठा चिंतेत सापडला होता. मात्र, पावसाने गेल्या दीड ते दोन महिने दांडी मारल्यानंतर लागोपाठ चार ते पाच दिवस कधी हलका कधी रिमझिम बरसल्याने शेतकरी राजा समाधानी झाल्याचे चित्र दिसत आहे.
पावसाने पाठ फिरविल्याने शेतातील पिके मोठ्या संकटात सापडली होती. शेतातील विहिरींची पाणीपातळीही खूप कमी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, श्रावण महिन्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे आणि तब्बल वर्षभराच्या कालखंडानंतर, तसेच पावसाळा अर्धा संपल्यानंतर तितूर नदीला थोडे पाणी आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. तितूरला जेमतेम आलेल्या पाण्यामुळे शेतातील विहिरींच्या जलपातळ्यांत थोडी वाढ झाली आहे.
पाऊस जरी पडला असला, तरी विहिरींची पाणीपातळी अजूनही वाढलेली नाही. त्यामुळे बळीराजा जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जोरदार पाऊस पडला, तर तितूर नदीही मोठ्या प्रवाहाने वाहेल. पाणीपातळी वाढून शेतकऱ्यांना आगामी काळात फायदा होईल. पावसाच्या आगमनाने शेती कामांना वेग आला आहे व मजुरांचीही कामाची चिंता दूर झाली आहे. पावसाच्या आगमनाने मजुरांना कामे मिळाली असल्याने मजुरांनीही समाधान व्यक्त केले आहे
चाराटंचाईची शक्यता
दरम्यान, पावसाने तब्बल दोन महिने दांडी मारल्याने, शेतकऱ्यांचे नियोजन मोठ्या प्रमाणावर कोलमडले आहे. त्यामुळे भर पावसाळ्यात पावसाने दांडी मारल्याने पशुपालकांनी चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, पावसाच्या दांडीने भविष्यातील चाराटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उत्पन्नावर होणार परिणाम
तब्बल दीड महिन्याच्या वरुणराजाच्या दांडीमुळे बरड भागातील, तसेच कोरडवाहू जमिनीच्या पिकावर मोठा परिणाम झाला आहे. बऱ्याच क्षेत्रात पिकाने ऊन पकडल्यामुळे पिके सुकू लागली होती. अनेक पिकांनी मान टाकल्या होत्या. लागोपाठ पाच दिवस पडलेल्या पावसाने काही पिकांनी तग धरला आहे, तर काही पिकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. यात ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन या पिकांच्या उत्पन्नावर परिणाम होईल, अशी चर्चा शेतकरी वर्गात आहे.
फोटो कॅप्शन
240821\img-20210823-wa0040.jpg~240821\24jal_4_24082021_12.jpg
थोडया प्रमाणावर आलेल्या पाण्यामुळे वाहणारी कजगाव ची तितुर नदी~अर्ध्या पावसाळ्यानंतर काही प्रमाणात वाहणारी तितूर नदी.