कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा रक्कम, जळगांव विद्यापीठाचा सामंजस्य करार
By अमित महाबळ | Published: July 4, 2024 06:50 PM2024-07-04T18:50:03+5:302024-07-04T18:50:51+5:30
यामुळे विद्यार्थ्यांना शिकाऊ प्रशिक्षणाच्या काळात स्टायपंड हाती पडण्याची खात्री मिळणार आहे
अमित महाबळ, जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या अंतर्गत नव्याने सुरू झालेल्या बी. कॉम. (बीएफएसआय) या चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विद्यापीठ आणि बीएफएसआय सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना शिकाऊ प्रशिक्षणाच्या काळात स्टायपंड हाती पडण्याची खात्री मिळणार आहे.
विद्यापीठाने बँका, वित्तीय संस्था तसेच विमा क्षेत्रात आवश्यक असणारी कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन या वर्षापासून विद्यापीठात बी.कॉम. (बीएफएसआय) हा चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा अप्रेंटिसशिप एम्बेडेड पदवी कार्यक्रम असून शिक्षणाला व्यावहारिक कामाच्या अनुभवासह एकत्रित करणार आहेत. ज्यामध्ये विद्यार्थ्यांची कौशल्ये व रोजगार क्षमता वाढणार आहे. विद्यार्थ्यांना बँका, वित्तीय संस्था तसेच विमाक्षेत्र यामध्ये बीएफएसआय सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने अप्रेंटिसशिप प्राप्त होईल. त्यासाठी दिनांक ३ जुलै रोजी, विद्यापीठ आणि सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
बीएफएसआय क्षेत्रात रोजगारासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि मानवी संसाधने निर्माण करण्याच्या उद्देशाने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. यासाठी सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त होणार आहे.
सामंजस्य करारावर स्वाक्षरी करतांना कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, बीएफएसआय सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य रंजन, नबरा चक्रवर्ती, प्रशाळेच्या संचालक प्रा. मधुलिका सोनवणे, प्रा. पवित्रा पाटील, प्रा. आर. आर. चव्हाण, प्रा. अतुल बारेकर, हर्षल नेरकर, अश्विनी मुंदडा आदी उपस्थित होते.
काय फायदा होणार?
सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना शिकाऊ म्हणून उद्योगात सहभागी होण्यासाठी सहाय्य केले जाईल, शिकाऊ उमेदवारांच्या मागणीचे एकत्रीकरण निश्चित करण्यासाठी उद्योग आणि विद्यापीठ यांच्यात परस्पर सहाकार्याने प्रशिक्षणार्थी सोर्सिंगची शाश्वत प्रणाली तयार केली जाईल. प्रशिक्षणार्थी कालावधी दरम्यान किमान निर्धारित मासिक स्टायपंड मिळण्याची खात्री असेल. अप्रेटींसशिप दरम्यान विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे सतत मूल्यमापन केले जाईल. विद्यार्थ्यांला प्रमाणपत्र दिले जाईल. विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना कौशल्य अभ्यासक्रमासाठी ऑफलाईन / ऑनलाईन शिक्षण सामग्री उपलब्ध करुन दिली जाणार आहे.