जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2018 12:59 PM2018-07-08T12:59:52+5:302018-07-08T13:00:36+5:30
ग्रामस्थांचे हाल
जळगाव : कुसुंबा येथील तुळसाईनगर भागात गेल्या चार महिन्यांपासून आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी शनिवारी सकाळी दहा वाजता कुसुंबा ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. यावेळी सरपंच देविदास पाटील यांनी आठ दिवसात वेळेवर पाणी पुरवठा सुुरु होणार असल्याचे लेखी आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले.
तुळसाईनगरात आठ ते दहा दिवसाआड पुरवठा होत असल्याने या भागातील रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी ७ जुलै रोजी सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात ४० ते ५० महिला व पुरुषही सहभागी झाल्या होत्या. जो पर्यंत पाण्याची समस्या सोडविण्यात येणार नाही, तो पर्यंत या ठिकाणाहून मोर्चा मागे घेणार नसल्याचा पवित्रा महिलांनी घेतला होता. यावर सरपंच देविदास पाटील यांनी या रहिवाशांशी चर्चा केली व आठ दिवसांत पाण्याची समस्या सोडवून ग्रामपंचायतीतर्फे वेळेवर पाणी पुरवठा करणार असल्याचे लेखी पत्राद्वारे आश्वासन दिल्यावर संतप्त महिलांनी आपला मोर्चा मागे घेतला. या मोर्चात मनीषा खैरनार, रंजनाबाई सोनवणे,सुरेखा पाटील, विनोद पाटील, गोपीचंद पाटील आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.