मराठा आरक्षणासाठी मंत्रालयावर मोर्चा काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:20 AM2021-08-14T04:20:43+5:302021-08-14T04:20:43+5:30

जळगाव : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आतापर्यंत शांततेच्या मार्गाने २८ मोर्चे काढूनही सरकारने मराठा समाज बांधवांना आरक्षण दिलेले ...

Morcha will be held at Mantralaya for Maratha reservation | मराठा आरक्षणासाठी मंत्रालयावर मोर्चा काढणार

मराठा आरक्षणासाठी मंत्रालयावर मोर्चा काढणार

Next

जळगाव : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आतापर्यंत शांततेच्या मार्गाने २८ मोर्चे काढूनही सरकारने मराठा समाज बांधवांना आरक्षण दिलेले नाही. सरकारच्या या चालढकल धोरणामुळे मराठा समाज संतप्त झाला आहे. लवकरच मराठा आरक्षणासाठी मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी शुक्रवारी जळगावात पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी न्यायालयात आरक्षण टिकले नाही, याला राज्य सरकारच जबाबदार आहे. मात्र, राज्य सरकार हे आरक्षणाबाबत केंद्राकडे बोट दाखवित आहे तर केंद्र हे राज्याकडे बोट दाखवित आहे. या दोघांच्या भांडणात आरक्षण मागे पडले असल्याची टीकाही नानासाहेब जावळे पाटील यांनी यावेळी केली.

मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेण्यासाठी व पुढील रणनीती आखण्यासाठी अ. भा. छावा संघटनेतर्फे राज्यभर दौरे सुरू असून, शुक्रवारी या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नानासाहेब जावळे पाटील हे जळगावात आले होते. यावेळी त्यांनी नूतन मराठा महाविद्यालयाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेतली. या पत्रपरिषदेला छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भीमराव मराठे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रा. आर. व्ही. पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यापुढे जावळे पाटील यांनी सांगितले की, आताच्या सरकारने आणि मागच्या सरकारनेही मराठा समाजाचा फक्त वापर केला. आरक्षणासाठी मराठा समाजाने आतापर्यंत काढलेले सर्व मोर्चे शांततेने निघाले. मात्र, या सरकारला शांततेची भाषा समजत नाही. त्यामुळे आता पुन्हा महामोर्चा काढण्याची वेळ आली असून, त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मराठा बांधवांचे मेळावे घेऊन, त्यांचे मत जाणून घेत आहोत. जळगावातील मेळाव्यानंतर पुण्यात २५ ऑगस्टला मेळावा आहे. या ठिकाणी मंत्रालयावर किंवा मातोश्रीवर मोर्चा काढण्याची दिशा ठरणार असून, तीन ते चार लाख मराठा बांधव सहभागी होणार असल्याचेही जावळे पाटील यांनी सांगितले.

इन्फो :

ज्यांनी विरोध केला, त्यांना निवडणुकीत पाडणार

छावा संघटना निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करणार असल्याबाबत, जावळे पाटील यांना विचारले असता, त्यांनी छावा संघटना निवडणुकांमध्ये उमेदवार उभे करणार नसली, तरी ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला आहे, त्यांना मात्र येत्या निवडणुकांमध्ये पाडणार असल्याचे जावळे पाटील यांनी सांगितले. तसेच कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक शुल्क पूर्ण माफ करण्याची मागणीही सरकारकडे केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

इन्फो :

तर एकाही कुटुंबाला न्याय नाही

आरक्षणासाठी मागील काळात काही तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र, सरकारकडून अद्यापही या मयतांच्या कुटुंबीयांना मदत मिळाली नसल्याचे जावळे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Morcha will be held at Mantralaya for Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.