धरणगावात पाणीप्रश्नी महिलांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:20 AM2021-08-27T04:20:52+5:302021-08-27T04:20:52+5:30
धरणगाव : येथील प्रभाग क्रमांक ५, लोहार गल्ली परिसरातील संतापलेल्या महिलांनी पाणी प्रश्नी माजी नगरसेविका नर्मदाबाई एकनाथ माळी ...
धरणगाव : येथील प्रभाग क्रमांक ५, लोहार गल्ली परिसरातील संतापलेल्या महिलांनी पाणी प्रश्नी माजी नगरसेविका नर्मदाबाई एकनाथ माळी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी नगरपालिकेवर मोर्चा काढला.
महिला नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांच्या दालनात त्या तब्बल एक तास ठिय्या मांडून होत्या. जोवर नगराध्यक्ष येत नाहीत आणि आमच्या समस्या जाणून घेत नाहीत तोपर्यंत आम्ही दालनातून निघणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत मोर्चातील महिला व नागरिक हैराण झाले. मुख्याधिकारी जनार्दन पवार, नगराध्यक्ष नीलेश चौधरी व प्रभाग ५चे नगरसेवक भालचंद्र जाधव, नगरसेविका शोभा राजपूत यापैकी कोणीही उपस्थित झाले नाही. त्यामुळे या सर्व संतप्त महिलांनी नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांच्या दालनात व न.पा.च्या आवारात हातातील बांगड्या दाखवत आणि बांगड्या फोडून निषेध नोंदवला.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदी व अंजनी नदी भरभरून वाहत असूनसुद्धा लोहार गल्ली परिसराला २३ दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नव्हता. गुरुवारी फक्त एक तास पाणी सोडल्यामुळे या महिलांचा संताप अनावर झाला. न. पा. कार्यालयात सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
पाणीपुरवठा अधिकारी अनुराधा चव्हाण यांच्या दालनात जाऊन जाब विचारला. सर्व महिला व नागरिकांनी दोन तास पालिका सभागृहात सत्ताधारी तसेच न. पा. प्रशासनाला धारेवर धरले. गेल्या महिनाभरात धरणगाव नगरपालिकेवर पाणीप्रश्नी नागरिकांनी दुसऱ्यांदा मोर्चा काढला.
याप्रसंगी महिलांसह किरण वऱ्हाडे, टोनी महाजन, विकास चौहान, हरीश माळी, दयाराम माळी, गोपाळ लोहार, हर्षल माळी आदी उपस्थित होते.
धरणगाव शहरात लवकरात लवकर पाणी मिळावे यासाठी दोन तासांऐवजी दीड तास पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे.
- नीलेश चौधरी, नगराध्यक्ष, धरणगाव
260821\screenshot_20210826-150920_mx player.jpg
महिलांचे समजूत काढताना नगराध्यक्ष निलेश चौधरी