१ लाखापेक्षा अधिक नागरिकांनी कोरोनाला हरविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:15 AM2021-04-25T04:15:52+5:302021-04-25T04:15:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी या नैराश्याच्या वातावरणात दिलासादायक चित्र समोर आले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी या नैराश्याच्या वातावरणात दिलासादायक चित्र समोर आले आहे. कोरोनाला हरविणाऱ्यांची संख्या १ लाखापेक्षा अधिक झाली आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या पंधरा दिवसांत कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सरासरी रोज १ हजार रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. यात अनेक वयस्कर नागरिकांचा समावेश आहे.
कोरोनाचे लवकर निदान झाल्यास घाबरू नका, हा लवकर बरा होणारा आजार आहे, असा संदेश कोरानाला हरविणाऱ्या रुग्णांनी दिला आहे. त्यामुळे या आजाराला न घाबरता तपासणी करणे व सामना करणे, हे या आजारशी लढण्याचे मोठे हत्यार असल्याचे या रुग्णांनी सकारात्मकतेने सांगितले आहे. गेल्या महिनाभराची परिस्थिती बघता रोजच्या नव्या रुग्णांपेक्षा आता बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून, कोरोनाचा आलेख हा खाली उतरत असल्याचे एक दिलासादायक चित्र निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचेही म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासूनचे हे दिलासादायक चित्र कायम असल्याने बेडची आणीबाणी आता बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. ऑक्सिजनचे पुरेसे बेड जिल्ह्यात उपलब्ध आहेत.
आम्ही रोज हरवतो कोरोनाला
रविवार १,०७४
सोमवार १,२०९
मंगळवार १,०५८
बुधवार १,१३४
गुरूवार १,२०४
शुक्रवार १,०३०
वृद्ध दाम्पत्याची अशीही मात...
हिरा शिवा कॉलनी परिसरातील ताराचंद शामराव पाटील (वय ७५) व विमलाबाई ताराचंद पाटील (वय ६५) या दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन या दोघांनी कोरोनावर मात केली आहे. या दाम्पत्याला राष्ट्रवादीचे कृणाल पवार, तसेच जनमत प्रतिष्ठानचे पंकज नाले, हे मदत करीत आहेत. विशेष बाब म्हणजे सर्वच बाबींचा तुटवडा असताना, अशा स्थितीत हे वृद्ध दाम्पत्य कोरोनावर कशी मात करेल, असे वाटत असताना या संकटातून ते धैर्याने बाहेर पडल्याचे कुणाल पवार यांनी सांगितले.
कोट
कोरोनाचे लवकर निदान केल्यास कोरोनावर मात करणे शक्य आहे. मला केवळ उलट्या झाल्या होत्या; पण परिस्थिती बघता मुलाने तातडीने तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता. सिव्हिलला ७ एप्रिलला तपासणी केली व ८ एप्रिलला पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. काही दिवस क्वारंटाइन सेंटरला नंतर सिव्हिलला दाखल होते. एकदम चांगले उपचार मिळाले. कोरोनावर मात करून मी घरी परतले. घाबरू नका, लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करा, यातून रुग्ण लवकर बरे होतात.
-विजया चौधरी,
श्वास घ्यायला त्रास होत होता. रात्री २ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झालो. खासगीपेक्षा शासकीय यंत्रणेत उपचार पद्धती अगदी चांगली असून, यावर लोकांनी विश्वास ठेवायला हवा, असा चांगला अनुभव मला या रुग्णालयात आला. १३ दिवसांनंतर बरा होऊन मी या ठिकाणाहून घरी आलो आहे. कोरोना बरा होणारा आजार आहे. घाबरू नका, केवळ लवकर निदान करून घ्या.
-राजेश चौधरी
काळजी घ्या, आनंदी राहा
कोरोनाचा अधिक बाऊही करू नये किंवा निष्काळजी राहू नये, या दोनही गोष्टी घातक आहेत. केवळ कोरोनाच्या बाबतीतच दिवसभर ऐकत बसण्यापेक्षा वेगळ्या ॲक्टिव्हिटी करीत राहा, पर्याय शोधा, सकरात्मक राहा, निराश होऊ नका, एखादा छंद जोपासा. काळजी घेतल्यास व योग्यवेळी उपचार घेतल्यास कोरोना हा बरा होणारा आजार आहे. ही मानसिकता ठेवा, मात्र मास्क, सुरक्षित अंतर, हात स्वच्छ ठेवणे, हे नियम पाळा, अधिक काळजी करू नका, सकारात्मक विचार ठेवा.
-डॉ. दिलीप महाजन, मानसोपचारतज्ज्ञ