जळगावात कोविडपेक्षा सारीने अधिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:15 AM2021-04-14T04:15:09+5:302021-04-14T04:15:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या भयावह स्थितीत कोविडपेक्षा सारीने अधिक मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोविडने जर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या भयावह स्थितीत कोविडपेक्षा सारीने अधिक मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोविडने जर ४० टक्के मृत्यू झाले असतील सारीने ६० टक्के मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले. शासनाकडे याची नेमकी आकडेवारी नाही. दरम्यान, गेल्या वर्षी कोविडचे रुग्ण कमी असेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सारीच्या रुग्णांची स्वतंत्र नोंद करून शासनाला कळविण्यात येत होते. आता ही नोंद होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, दुसरीकडे मृतांची संख्याही वाढली आहे. मात्र, त्यातच अचानक संशयित व नंतर निगेटिव्ह असणाऱ्या रुग्णांचे मृत्यू वाढल्याचे चित्र समोर येत आहे. यात सारीमुळेही अधिक मृत्यू होत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पूर्वी केवळ वृद्धांमध्येच हे प्रमाण आढळून येत होते. मात्र, आता तरुणांनाही बाधा होण्याचे शिवाय ते गंभीर होण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्वच विषाणूंमध्ये बदल होत असतात. गेल्या वर्षीही सारीमुळे मृत्यू झाले होते. त्या आधीही न्युमोनियाने मृत्यू होत होते.
कोट
सारीमुळे अधिक मृत्यू झाले आहेत. गेल्या वर्षी वृद्धांमध्ये हे प्रमाण अधिक होते, मात्र आता तरुणांमध्येही ते आढळत आहे. एकूण मृत्यूपैकी जर ४० टक्के कोरोनाने तर ६० टक्क्यांपर्यंत मृत्यू हे सारीमुळे झालेले आहेत.
-डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक
सारी वर्षानुवर्षे चालत येणारा आजार
सारी सिव्हीअर ॲक्युट रेस्पिरेटरी इलनेस हा अचानक समोर आलेला आजार नसून यापूर्वीही न्युमोनियाने मृत्यू व्हायचे, मागच्या वर्षी अशा मृत्यूंची सारीमध्ये नोंद करायला सुरूवात झाली. तज्ज्ञांच्या माहितीनुसार २५ विविध प्रकारचे विषाणू असून कोविड हा त्याच्यातील एक आहे. आता सारी, न्युमोनिया व कोविड यांची लक्षणे ही एकच असल्याने आपण कोविड टेस्ट करतो. ज्याच्या स्कोर अधिक व टेस्ट निगेटिव्ह त्याचे सारी हे निदान होते. या पूर्वीही सारीचे मृत्यू होते. कोरोना व्यतिरिक्त अन्य विषाणूंनीही होणारा हा आजार आहे.
लक्षणे
सर्दी, ताप, खोकला, श्वास घ्यायला त्रास होणे अशी याची लक्षणे आहे. हा आजार श्वसनाशी निगडित आहे. यात मृत्यूदर हा दोन ते तीन टक्के असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा आजार विविध विषाणूंच्या संसर्गाने होतो. याचा कोविडशी संबध नाही, किंवा त्यांच्या संपर्कात आल्याने हा आजार होतो असेही नाही. सध्या कोविडची साथ सुरू असल्याने त्याची तपासणी होत आहे. लक्षणे सारखीच असल्याने निगेटिव्ह रुग्णांना सारीची लागण झाल्याचे निदान डॉक्टर करतात, असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.