पंधराशेपेक्षा अधिक कर्मचारी, लस घेतली केवळ ५९ जणांनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:14 AM2021-01-17T04:14:45+5:302021-01-17T04:14:45+5:30
जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लसीच्या लसीकरण मोहिमेला शनिवारी सुरुवात झाली; मात्र पहिल्याच दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ...
जळगाव : कोरोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लसीच्या लसीकरण मोहिमेला शनिवारी सुरुवात झाली; मात्र पहिल्याच दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ८ डॉक्टरांसह केवळ ५९ कर्मचाऱ्यांनी लस टोचून घेतली. उद्दिष्ट शंभर ठेवून तसे एसएमएसही पाठविण्यात आले होते; मात्र भीती, संभ्रम आणि परिणामाची वाट बघणे अशा काही कारणांमुळे ही संख्या निम्म्यावर आल्याची माहिती आहे. डी.बी. जैन रुग्णालयात ८३ जणांनी लस घेतली. शहरात एकाही लाभार्थीला त्रास झाला नसल्याची माहिती आहे.
सीएस, डीएचओ न थांबता केंद्रावर रवाना
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर लस घेतली; मात्र निरीक्षण कक्षात न थांबत ते थेट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बाहेर निघाले आणि डी. बी. जैन रुग्णालयात पाहणीसाठी गेले. अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्यासह अन्य सर्व कर्मचारी मात्र प्रत्येकी अर्धा तास निरीक्षण कक्षात थांबून होते.
गर्दीमुळे अधिष्ठाता यांना त्रास
अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना लस दिली जात असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी प्रचंड गर्दी झाली होती. यामुळे लस घेतल्यानंतर सुरुवातीचे दोन मिनिटे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांना घाम येणे व थोडा श्वास घ्यायला त्रास झाला; मात्र पाच मिनिटांनी ते सामान्य झाले. पूर्ण अर्धा तास त्यांना कसलाच त्रास झाला नाही.
नोंदणीच्या दोन तासांनी लस
अमित वाघडे यांनी ९.५० वाजताच नोंदणी केली; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्याशिवाय लसीकरणाला सुरुवात करू नये, अशा सूचना होत्या. त्यामुळे नोंदणीनंतर तब्बल दोन तासांनी अमित वागडे यांना ११.५२ वाजता लस देण्यात आली.
निरीक्षण कक्षातच कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या
वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांनी लस घेतल्यानंतर ते निरीक्षण कक्षात डॉक्टरांच्या निगराणीखाली असताना काही प्रशासकीय कर्मचारी आले व त्यांनी याच ठिकाणी काही कागदपत्रांवर डॉ. सोनार यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या.
या डॉक्टरांनीही घेतली लस
जीएमसीत वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार, औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. किशोर इंगोले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे, शरिररचना शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अरूण कासोटे यांसह डी. बी. जैन रुग्णालयात प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. तिलोत्तमा गाजरे, बालरोगतज्ज्ञ डॉ. गौरव पाटील, भूलतज्ज्ञ डॉ. अश्विनी टेनी या डॉक्टरांनी पहिल्या दिवशी लस घेतली.