जिल्ह्यात दहा लाखांपेक्षा अधिक कोरोना चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:15 AM2021-05-13T04:15:55+5:302021-05-13T04:15:55+5:30
जळगाव : जिल्ह्यात ११ मे पर्यंत १० लाख ८ हजार २८८ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १ लाख ...
जळगाव : जिल्ह्यात ११ मे पर्यंत १० लाख ८ हजार २८८ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात १ लाख ३१ हजार ५७४ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. प्रशासन व आरोग्य यंत्रणेने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर १३ टक्क्यांपर्यंत खाली आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रिटमेंटवर भर दिला असून, यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषदेच्या क्षेत्रात अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य यंत्रणेमार्फत माझे कुटुंब, माझी जबाबदारी, संशयित रुग्ण शोधमोहीम प्रभावीपणे राबवून कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात रॅपिड अँटिजन टेस्टचे ग्रामीण व शहरी भागात शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आरटीपीसीआर लॅबमध्ये देखील चाचणी केली जाते. तसेच अहवाल वेळेत मिळण्यासाठी आवश्यकतेनुसार खासगी प्रयोगशाळांकडेही अहवाल तपासण्यासाठी पाठविले जातात. त्वरित निदान, त्वरित उपचार या उक्तीप्रमाणे जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीस कोरोनासदृश लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी त्वरित नजीकच्या रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे.
जिल्ह्यात दररोज होणाऱ्या चाचण्या - सरासरी ७ हजार
आतापर्यंत केल्या गेलेल्या चाचण्या - १० लाख ८ हजार २८८
अँटिजन चाचण्या - ७,०७,०९२,
अँटिजन चाचणीतून पॉझिटिव्ह - ७७,११४
आरटीपीसीआर चाचण्या - ३,०१,१९६
आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह - ५४४६०