कोरोनाच्या संकटात मदतीऐवजी बतावणीच अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:14 AM2021-05-17T04:14:12+5:302021-05-17T04:14:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी या काळात राजकीय पक्षांकडून सामान्यांना मदत मिळणे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी या काळात राजकीय पक्षांकडून सामान्यांना मदत मिळणे अपेक्षित असताना जनतेला वाऱ्यावर सोडत राजकीय मंडळीकडून राजकारणच सुरू असल्याची स्थिती जिल्हावासी अनुभवत आहेत. यामध्ये केंद्रात सत्ताधारी व राज्यात विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळात तपासणी, लसीकरण केंद्र सुरू करणे तसेच कोरोनाविषयी माहिती देण्यासाठी उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा काही दिवसांचा देखावाच ठरला. यात सातत्य न राहता भाजपकडून प्रशासकीय भेटीगाठींवर अधिक भर दिला जाऊ लागला.
कोरोना संसर्ग वाढत असताना सर्वांनी जनतेसाठी काम करणे अपेक्षित असताना राजकीय नेते मात्र या महामारीतही संधी शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातूनच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले आरोप- प्रत्यारोप थांबलेले नातही. इतकेच नव्हे आपण काहीतरी करीत आहोत, हे दाखविण्यासाठी भाजपचे खासदार, आमदार वारंवार प्रशासनाकडे विविध मागण्या करीत इशारे देत आहेत.
लसोत्सवातील सातत्य हरविले
कोरोनाच्या संकटात भाजपच्यावतीने मदत म्हणून लसीकरण करीत लसोत्सव सुरू केला. मात्र या उत्सवात लस मिळाली, ना जनतेला आधार मिळाला. या शिवाय मध्यंतरी भाजपच्यावतीने कोरोना संसर्गाला आळा बसावा म्हणून तपासणी मोहीम राबविली. मात्र एका दिवसाच्या या मोहिमेनंतर तपासणी बंद पडली. याशिवाय जनतेला कोरोना विषयी माहिती देण्यासाठी मदत केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न झाला मात्र जनता या मदत केंद्रापासून दूरच राहिली.
आरोग्यदूतांकडून संशय
जनतेसाठी नेहमी आरोग्यविषयक मदत व्हावी म्हणून पुढाकार घेणारे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या मतदारसंघात अनेकांना मदत केल्याचे सांगितले जाते. या मात्र या कोरोनाच्या संकटातच या आरोग्यदूतांनी रुग्णसंख्या व मृतांच्या आकडेवारीवर संशय व्यक्त करीत राज्य सरकारवर टीका करण्याची संधी सोडली नाही. यामध्ये राज्य शासन कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून आपले अपयश लपविण्यासाठी कोरोनाची चाचणी, मृतांचा आकडा अशा सर्वच बाबतीत लपवाछपवी करीत असल्याने इतका वाईट प्रसंग जनतेवर आला असल्याची टीका त्यांनी केली.
जनतेची फिरफिर, पदाधिकारी राजकारणात
शासनाच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्यात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, तरीही शासन हा विषय गांभीर्याने घेत नाही, असे म्हणणारे भाजपचे पदाधिकारी ज्यावेळी सामान्य नागरिक रेमडेसिविर व इतर औषधोपचारासाठी धावपळ करीत होते त्यावेळी कोणाच्या मदतीसाठी धावले नाही. उलट रेमडेसिविर, ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा आहे, असे सांगू लागले.
भाजप नेत्यांचाही विचारला लेखाजोखा
भाजपकडून आरोप होत असताना केंद्र सरकारकडून राज्य सरकारला हवी तशी मदत मिळत नसल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला जाऊन गिरीश महाजन यांनाही लक्ष्य करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव महापालिकेसाठी डीपीडीसीतून निधी दिला तसेच कोरोना उपाययोजनांसाठी विविध पावले उचलल्याचे सांगत गिरीश महाजन व चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना त्यांनी किती निधी दिला, असा सवाल शिवसेनेकडून उपस्थित केला गेला.
दर आठवड्याला जिल्हाधिकारी कार्यालयात
गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते जवळपास दर आठवड्याला जिल्हाधिकारी कार्यालयात भेटी देत विविध मागण्या करीत आहे तर कधी गंभीर इशारा देत आहे. या काळात प्रशासनाला सहकार्य करीत राजकारण बाजूला ठेवून कोरोनाशी दोन हात करणे अपेक्षित असताना प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला.