सव्वा दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:21 AM2019-02-25T11:21:17+5:302019-02-25T11:22:05+5:30
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना
जळगाव : शेतकºयांना निश्चित उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ रविवारपासून करण्यात आला. याचा जिल्ह्यातील दोन लाखाहून अधिक शेतकºयांना लाभ मिळणार आहे. जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील कृषी विज्ञान केद्रात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी आमदार सुरेश भोळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, एन.आय.सी.चे प्रमुख प्रमोद बोरोले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. सुदाम पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.बाहेती, नाबार्डचे श्रीकांत झांबरे,खते तसेच कृषी बियाणे विक्रेते, प्रातिनिधीक स्वरूपात निवड झालेले शेतकरी, विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
लाभार्थींची यादी तयार करण्याचे ७९ टक्के काम पूर्ण
जिल्हा प्रशासनासह कृषी,महसूल, कृषी विज्ञापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम ७९.५२ टक्के पूर्ण झाले आहे. लवकरच पात्र शेतक-यांच्या खात्यात थेट निधी जमा करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ. ढाकणे यांनी दिली. शेवटच्या लाभार्थ्यांच्या खात्यात निधी पोहचविण्यासाठी शासन कटिबध्द असुन शेतक-यांच्या खात्यात निधी पोहचविण्यासाठी काही त्रुटी किंवा अडचणी असल्यास लाभार्थ्यांनी ग्रामपातळीवर, तालुका पातळीवर व जिल्हा पातळीवर तयार करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार करावी असेही आवाहन त्यांनी केले.
आवश्यक कागदपत्रे
गावपातळीवर पात्र शेतक-यांच्या कुंटूबीयांचे निश्चितीकरण करून लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यासाठी शेतकºयांचे नाव , लिंग , प्रवर्ग, आधारक्रमांक, बँकखाते क्रमांक , आयएफएससी कोड ,मो.क्रं, जन्मतारीख व पत्ता इत्यादी माहिती शेतक-यांनी दयावयाची आहे. तसेच सामाईक कुटूंबातीेल एक सदस्यांनी योजनेचा लाभ बँक खात्यावर अदा करण्यासाठी स्वयं घोषणापत्र दयावयाचे आहे.
लाभार्थ्यांची यादी अंतिम झाल्यावर केंद्र शासनाच्या पीएम किसान पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डीबीटीव्दारे निधी जमा होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर सनियंत्रण समित्या गठित करण्यात आल्या आहेत.
२ लाख २७ हजार ७४३ शेतकºयांना मिळणार लाभ
२ लाख २७ हजार ७४३ शेतकरी कुंटूबीयांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ पोहचणार असल्याचे माहिती जिल्हा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली. ही योजना राज्यात १ डिसेंबरपासून राबविण्यात मान्यता प्रदान करण्यात आली असून, या योजनेतंर्गत विहित निकषांप्रमाणे ज्या कुटंबाचे (पती, पत्नी व त्याची १८ वर्षाखालील अपत्ये) सर्व ठिकाणचे मिळून लागवडीलायक २ हेक्टर पर्यंत क्षेत्र असलेल्या शेतकरी कुंटबियांस २ हजार प्रती हप्ता याप्रमाणे दरवर्षी ३ हप्त्यात सहा हजार रूपयापर्यंत लाभ मिळणार आहे. या योजनेचा पहिला हप्ता ३१ मार्च पर्यंत शेतकºयांच्या खात्यात थेट जमा होणार आहे.