मोरखरचुडी या दुर्मिळ वनस्पतीची जिल्ह्यात नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:15 AM2021-02-12T04:15:53+5:302021-02-12T04:15:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जैवविविधतेने समृध्द सातपुडा पर्वतरांगमध्ये अनेकवेळा दुर्मिळ वनस्पतींचे अस्तित्व आढळून आले असून, शहरातील डॉ.तन्वीर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जैवविविधतेने समृध्द सातपुडा पर्वतरांगमध्ये अनेकवेळा दुर्मिळ वनस्पतींचे अस्तित्व आढळून आले असून, शहरातील डॉ.तन्वीर खान व उमेश पाटील या वनस्पती अभ्यासकांनी सातपुड्यात मोरखरचुडी (सिरोपीजीआ ऑक्यूलॅटा) या दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या वनस्पतीची नोंद केली आहे.
मोरखरचुडी या वनस्पतीला मोराच्या मानेसारखी ४ सेमी पर्यंतची तपकिरी रंगाचे फुल असते. फुलाच्या टोकावर बारीक केस असतात. डोंगर उतारावर झुडुपांमध्ये ही वनस्पती आढळून येते. इकरा एच.जे.थीम महाविद्यालयाचे प्रा.डॉ.तन्वीर खान व उमेश पाटील अभ्यासासाठी सातपुडामधील लंगडा आंबा परिसरात गेले असता, तेथे ही वनस्पती आढळून आली. या वनस्पतीच्या पृष्ठीकरणासाठी डॉ.शरद कांबळे यांना पाठविले होते. त्यांनीही या नोंदीला दुजोरा दिला आहे. या वनस्पतीवर तयार केलेला शोधनिबंध ‘बायोइंफोलेट’ या विज्ञान पत्रिकेमध्ये प्रकाशित झालेला आहे. यासाठी विवेक देसाई, मयुर जैन, गणेश सोनार व रेवन चौधरी यांचे सहकार्य लाभले.
रेड डाटा बुक मध्ये या वनस्पतीची नोंद
मोरखरचुडी (सिरोपीजीआ ऑक्यूलॅटा) या वनस्पतीची रेड डाटा बुक या पुस्तकाच्या तीन आवृत्तीमध्ये नोंद करण्यात आली आहे. या बुकमध्ये भारतातील लुप्त होणाऱ्या दुर्मिळ वनस्पतींचा समावेश होत असतो. लंगडा आंबा परिसर हा जिल्ह्यातील जैवविविधतेचा हॉटस्पॉट असून, दुर्मिळ वनस्पतींचे जतन करण्याची गरज असल्याचे मत डॉ.तन्वीर खान यांनी व्यक्त केले.