सलग दुसऱ्या दिवशी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना पोलीस ठाण्याची हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:16 AM2021-05-19T04:16:14+5:302021-05-19T04:16:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बंदी असतानाही मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पकडून पोलीस ठाण्यात नेले. मोहाडी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बंदी असतानाही मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी पकडून पोलीस ठाण्यात नेले. मोहाडी रस्त्यावर लांडोर खोरी उद्यानात ५८, तर आकाशवाणी चौकात ३५ जणांना पकडण्यात आले. यासोबतच विनामास्क फिरणाऱ्या ३१ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.
रामानंदनगर पोलिसांचे पथक मंगळवारी सकाळी ७ वाजताच मोहाडी रस्त्यावरील लांडोरखोरी उद्यानाजवळ धडकले. रस्त्याने जाणाऱ्या लोकांची धरपकड करून त्यांना थेट पोलीस वाहनात बसवण्यात आले. विनामास्क फिरणाऱ्या २३ जणांकडून ११ हजार ५०० रुपयांचा, तर माॅर्निंग वाॅक करणाऱ्यांकडून ११ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल बडगुजर, सहायक निरीक्षक दीपक बिरारी, संदीप परदेशी, सहायक फौजदार गोपाळ चौधरी, शिवाजी धुमाळ, रमेश अहिरे व हरीश डोईफोडे यांनी ही कारवाई केली.
आकाशवाणी चौकातही जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे व सहकारी दाखल झाले. त्यांनीदेखील या चौकात ३५ जणांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. शनिपेठ पोलिसांनी सकाळी फिरणाऱ्या ६४ जणांना, तर विनामास्क असलेल्या नऊ जणांना पकडले. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० प्रमाणे दंड वसूल करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू असतानाही सोमवारी मॉर्निंग वॉकला निघालेल्या ५१ जणांची रामानंदनगर पोलिसांनी पोलीस वाहनातून सवारी काढत त्यांना थेट पोलीस ठाण्यात नेले. दंडात्मक कारवाई करून त्यांना सोडण्यात आले. मंगळवारीदेखील या सर्व जणांना कारवाई करून सोडण्यात आले.
विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका व पोलिस प्रशासनाला दिले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई सुरु केली आहे. सलगच्या या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
अशी आहे कारवाई
माॅर्निंग वाॅक : १५७
विनामास्क : ३१