भुसावळ शहर व तालुक्यात तपासणी व सर्वे योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे मृत्यूदर जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 06:49 PM2020-06-21T18:49:47+5:302020-06-21T18:51:22+5:30
भुसावळ शहर व तालुक्यात कोरोनाने गेल्या दोन महिन्यापासून कहर केला आहे.
भुसावळ : शहर व तालुक्यात कोरोनाने गेल्या दोन महिन्यापासून कहर केला आहे. त्यात मृत्यू दरही जास्त प्रमाणात आहे. तपासणी व सर्व योग्य पद्धतीने होत नसल्यामुळेच मृत्यूदर जास्त असल्याचे मत केंद्रीय समितीने व्यक्त करून नाराजी व्यक्त केली आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी तपासणी व सर्वे योग्यप्रकारे करण्यात यावा, अशा सूचना प्रांताधिकारी रामसिंग सुलाने व आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून कुटुंब कल्याण विभागाचे वरिष्ठ प्रादेशिक संचालक डॉ.अरविंद अलोने व सार्वजनिक आरोग्य विभागाचे सल्लागार डॉ.एस.डी.खापर्डे यांचे केंद्रीय पथक दाखल झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी कसा करता येईल, यासाठी २० रोजी पथकाने जळगाव शहराची पाहणी केली. २१ रोजी केंद्रीय पथक भुसावळ शहरात होते. पथकाने जवाहर नदयोय विद्यलयातील कोविड सेंटर, भोई नगरातील कंटेनमेंट झोनची पाहणी केली व रेल्वे हॉस्पिटल कोविड सेंटरला भेट दिली.
रुग्णांना काय काय सुविधा देण्यात येतात?
जवाहर नवोदय विद्यालय व रेल्वे दवाखान्यातील कोविंड सेंटर येथे पथकाने पाहणी केली व चौकशी केली. रुग्णांना काय काय सुविधा देण्यात येतात, कोविड सेंटरची क्षमता किती रुग्णांची आहे, ७५० रुग्ण असल्यानंतरही, अजून वाढवा. यापुढे मृत्यूदर वाढणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना देऊन डॉक्टरांशी चर्चा केली. सर्वे योग्य पद्धतीने करून पॉझिटिव्ह रुग्णांना शोधून काढा. त्यांच्यावर उपचार करा. त्यानंतरच मृत्यूदर कमी होऊ शकतो, अशा सूचना समितीने दिल्या.
यावेळी पथकासोबत जात पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, उपजिल्हाधिकारी तथा पालिकेचे प्रभारी सीईओ किरण सावंत, डीवायएसपी गजानन राठोड, तहसीलदार दीपक धिवरे, गटविकास अधिकारी विलास भटकर, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब ठोंबे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता पांढरे , डॉ.कीर्ती फलटणकर आदी उपस्थित होते.
पथकाने घेतली प्रांत कार्यालयात बैठक
केंद्रीय पथकाने प्रांत कार्यालयात डॉक्टर व अधिकाºयांची बैठक घेतली. यात शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आढावा घेण्यात आला. तसेच दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहून अधिकारी व कर्मचाºयांना विशेष सूचना दिल्याचे सांगण्यात आले.
प्रसार माध्यमांना ठेवले अलिप्त
कोरोनाचा कहर रोखण्यात प्रशासन कमी पडत आहे. यामुळे केंद्रीय पथकाने कानउघडणी केली. हा प्रकार उघडकीस येऊ नये व आपले पितळ उघडे पडणार या भीतीपोटी प्रसार माध्यमांना अलिप्त ठेवण्यात आले, तर केंद्रीय पथकाने पत्रकारांना माहिती देण्यात टाळाटाळ केली व पथक जळगाव रवाना झाले.
पथकाने कोविंड सेंटरची केली बाहेरूनच पाहणी
केंद्रीय पथकाने रेल्वे दवाखान्यांमध्ये कोविड सेंटरची पाहणी केल्याची माहिती अधिकारी देत आहे, तर पथकातील अधिकाºयांनी सेंटरमध्ये पाहणीच केली नसल्याची माहिती एका रुग्णाने दिली आहे. त्यामुळे केंद्रीय पथकाने केवळ दौºयाचा फार्स केल्याचे दिसून येत आहे. कोविड सेंटरमध्ये न जाताच पथकाला समस्या काय दिसणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या रुग्णालयात सुविधा चांगली मिळत असल्याचेही त्या रुग्णाने सांगितले.