गहाणवटीचा ऐवज - डोके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 11:38 PM2018-06-04T23:38:57+5:302018-06-04T23:38:57+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये साहित्यिक प्रा.अनिल सोनार यांचा ‘हसु भाषिते’ या सदरात विशेष लेख ‘गहाणवटीचा ऐवज डोके’

Mortgage lien - head | गहाणवटीचा ऐवज - डोके

गहाणवटीचा ऐवज - डोके

Next

माझा जुना स्रेही मध्या, वयानुसार मधू, मधुकरराव, मधुकाकाचा यथावकाश मधुआजोबा झालेला असला तरी माझी जिभ जुनं वळण सोडायला तयार नसल्यामुळे मी म्हणालो, ‘मध्या, सिने व्यवहाराचा आणि डोक्याचा काहीही संबंध नसतो, हे सिद्ध करण्यासाठी मी तुला तुझाच दाखला देतो. हे बघ, ते वय, तो जमाना, सिनेमा फक्त चित्रपटगृहातच पाहायची अपरिहार्यता असण्याच्या त्या दिवसात तू तुझ्या तारुण्यातला रम्य काळ ‘फर्स्ट डे, फर्स्ट शो’ बघण्याच्या नशेत घालवलास की नाही.
घरी न कळू देता, भर तळपत्या उन्हात. तिकीट खिडकी समोरच्या मैलभर रांगेत उभे राहून, शाखे‘वरच्या’ न खाणार, न खाऊ देणार’ ह्या धिरोदात्त संस्कारांना थोडावेळ मेंदूआड करत, तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांकडून तिकीट खरेदी करून ‘जितम् मया’च्या थाटात आनंद विभोर झालास की नाही. आठव ते तिकीट खिडकीचे मुत्सद्दी लाकडी भोक. पैसे घेताना हात सहज आत जाऊ देणारं, पण तिकीट आणि सुटे पैसे घेऊन मूठ आवळली की, मुठीवरच्या त्वचेची सालटी सोलून काढल्याशिवाय मुठीला बाहेर जाऊ न देणारं.
मध्या, ह्या देशातल्या शंकराच्या दगडी देवळातल्या पिंंडीपर्यंत पोहचायचे दार छोटे, ठेंगणे आणि लहान का असते, आणि चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीचे भोक लहान का असते माहीत आहे? लोकांनी डोक्याचा विचारपूर्वक वापर करावा म्हणून. पहिल्या दिवशी काय आणि दहाव्या दिवशी काय सिनेमा एकच दिसतो. नायिका कपडे काढून पाण्यात शिरणार तेवढ्यात धडाडत जाणारी रेल्वे आडवी जाते. रेल्वे निघून जाते, तोवर नायिका गळ्यापर्यंत पाण्यात. एकदा तरी ट्रेन लेट होईल ह्या आशेवर तोच सिनेमा लागोपाठ पाच दिवस पाहाणारा तू, तुला कसं कळणार की, अगदी गांभिर्याने गंभीर विषयावर चित्रपट काढणारे निर्मातेही काही वेगळे नसतात-
हिंंदी चित्रपट निर्माते फारच सावध असतात, पूर्णसत्य दाखवून नाव ‘अर्धसत्य’ ठेवतात.
तू हिंदी मालिका पाहात असताना म्हणे स्वत:चं हसं करून घेतलंस. ‘दोन्ही बहिणी बहिणी असतानाही मोठी त्या छोटीला ‘माँ’ का म्हणतेय’ म्हणून सूनबाईला विचारलंस म्हणे. मध्या, अरे, ह्या मालिका आणि हिंदी सिनेमावाल्यांचं विश्व फार वेगळं असतं. हे कळण्यासाठी जरासा तुझ्या खांद्यावरचा आणि टोपीच्या खालचा प्रदेश वापरून बघ की, अरे बाबा, तिथे सर्वांनाच सदैव तरूण आणि सुंदर दिसायचं असतं आणि म्हणून -
ते ग्लॅमरचे जग फारच अद्भुुत आणि विचित्र असते, नायिका सोळाची, तर तिची आई विशीतली दिसते.
बरं, पण हे नुसतं दिसण्यापुरतं असून चालत नाही. नाही तर तुम्ही लोक सिनेमा पाहाणार कशाला? तेव्हा राहाणं उंची असावं लागतं. सासू जेव्हा म्हणते, ‘मै मेरे घर मे यह नही होने दुंगी.’ तेव्हा सांगावंसं वाटतं की बाई गं, मेरे ‘राजमहल’ मे म्हण. मेरे ‘शिशमहल’ मे म्हण. ऐकेक ‘खोली’ हजार हजार चौरस फुटांची, आणि छताला पाचपन्नास झुंबरं असलेला क्रिकेटच्या मैदानाएवढा दिवाणखाना. प्रत्येकीच्या अंगावर दोन पाच कोटीचे दागिने. विमानाच्या धावपट्टीच्या लांबीचे स्त्रियांच्या अंगावरच्या महागड्या साड्यांंचे पदर.
मध्या, मी सैगलचा, दिलीपकुमारचा देवदास पाहिलाय. पण शाहरुखखानचा देवदास पाहिल्यावर मला जो प्रश्न पडला, तो कदाचित त्यातल्या पारो, आणि चंद्रमुखीलाही पडला असावा-
उंची वस्त्रे, दाग दागिने, कश्शा कश्शाची उणीव नाय, पारो, चंद्रमुखी म्हणाल्या, आता देवदासचं करायचं काय?
- प्रा.अनिल सोनार

Web Title: Mortgage lien - head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.