रावेर वनक्षेत्रात सर्वाधिक प्राण्यांची नोंद!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 05:01 PM2024-05-25T17:01:06+5:302024-05-25T17:02:26+5:30
यावल वनविभागातील सात वनपरिक्षेत्रापैकी रावेरमध्ये सर्वाधिक प्राण्यांची नोंद झाली आहे. या वनक्षेत्रात वाघ, बिबट्यासह अनेकांनी दर्शन दिल्याने वन्यप्रेमींना मोठा आनंद घेता आला आहे.
कुंदन पाटील
जळगाव : यावल वनविभागातील सात वनपरिक्षेत्रापैकी रावेरमध्ये सर्वाधिक प्राण्यांची नोंद झाली आहे. या वनक्षेत्रात वाघ, बिबट्यासह अनेकांनी दर्शन दिल्याने वन्यप्रेमींना मोठा आनंद घेता आला आहे.
यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांच्या नेतृत्वाखाली बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पर्यटकांना वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्याचा आनंद घेण्यासाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यासाठी चोपडा वनक्षेत्रात ३., वैजापूरला ७, अडावद ४, देवझिरी ४, यावल पूर्वमध्ये ७, पश्चिममध्ये ६ तर रावेर वनक्षेत्रात १२ अशा ४२ मचाण उभारण्यात आल्या होत्या. बुध्द पौर्णिमेला सायंकाळी ५ वाजेपासून सकाळी ७ वाजेपर्यंत वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यात आली.
यात पर्यटकांना वाघ आणि बिबट्यांसह, अस्वल, कोल्हा, तरस, निलगाय, चिकारा, चितळ, भेकर, सायाळ, रानडुक्कर, माकळ, मोर, घुबळ, सर्पगरुड, रातवा, कापशी घार, धामणसाप, घोणस, मन्यार, रानमांजर, ससा, मोर आदी वन्यप्राण्यांचे मनसोक्त दर्शन घेता आले. चिंचाटी धरणावरील अंजन मचानीवर असलेले वन्यजीप्रेमी अर्जुन ठाकुर, वनरक्षक राजु बोंडल यांना वाघाचे दर्शन झाले. रावेर वनक्षेत्रातील गारबर्डी, लोहारा, कुसुंबा या सफारी क्षेत्रात ठिकठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आलेले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. या मोहिमेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, रेल्वेच्या डीआरएम इति पांडे, फैजपूरच्या प्रांताधिकारी तथा परिविक्षाधीन जिल्हाधिकारी देवयानी यादव यांनीही सहभाग घेतला होता.
वनक्षेत्रनिहाय प्राण्यांची नोंद
चोपडा: २७
वैजापूर :५८
अडावद : २२
देवझिरी : ३४
यावल पूर्व: ७८
यावल पश्चिम : ६४
रावेर : ३०१
एकूण : ५८४
कोट
यावल वन विभागात गेल्या दोन वर्षापासुन सातपुडा परिसरात वन्यप्राण्यांकरीता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने कामे करण्यात आलेली आहे. त्यामुळे सातपुडा परिसरात जैविक विविधता निर्माण झालेली आहे व वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ होण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
-जमीर एम.शेख, उपवनसंरक्षक.