उपचार करता करता बहुतांश डॉक्टर पडले आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:53 PM2020-07-19T12:53:11+5:302020-07-19T12:53:48+5:30
उपचारासाठी अन्य विभागाच्या तज्ज्ञांची मदत, नागपूरहून तज्ज्ञ येण्याची शक्यता
आनंद सुरवाडे
जळगाव : कोरोनाच्या अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करण्याची प्रमुख जबाबदारी ही फिजिशियन्स अर्थात औषध वैद्यक शास्त्र विभागाच्या डॉक्टर्सची असताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील याच विभागातील बहुतांश डॉक्टर हे आजारी आहेत तर काही डॉक्टर नियमामुळे उपचारांपासून दूर असे चित्र जळगावात आहे़ एका प्रमुख डॉक्टरांचा कोरोना अहवाल पुन्हा पॉझिटीव्ह आल्याने या अडचणीत अधिक भर पडली आहे़
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. गेल्या दोन दिवसापासून तर बाधित रुग्णांची संख्येचे त्रिशतक होत आहे. त्यामुळे मोठीच चिंता वाढली आहे. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी बाधितांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे त्याचा भार अर्थातच कोविड रुग्णालयावर पडत आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधील औषधवैद्यक शास्त्र विभागाच्या डॉक्टरांची संख्या घटली आहे़ दुसरीकडे मात्र, रुग्ण वाढत आहे़ एक डॉक्टरवर चार कक्षांचा भार असल्याचे चित्र आहे़ मुख्य औषध वैद्यकशास्त्रचे डॉक्टर कमी असल्याने त्वचेसह अन्य विकारांच्या डॉक्टरांची उपचारासाठी मदत घेतली जात आहे.
नागपूरवरून डॉक्टर येणार
गेल्या महिन्यात इतर जिल्ह्यातून काही डॉक्टर्स जळगावला उपचार करण्यासाठी आले. आता नागपूरहून नव्याने काही डॉक्टर्स येणार असल्याची माहिती मिळाली. कोविड रुग्णालयात काही डॉक्टर्सची आवश्यकता असल्याचे पत्र वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ़ तात्याराव लहाने यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.