आई आणि आकाशवाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:36 AM2018-05-21T00:36:52+5:302018-05-21T00:36:52+5:30

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात जळगाव येथील साहित्यिक किशोर कुलकर्णी यांनी आपल्या लेखनामागील सांगितलेली प्रेरणा.

Mother and AIR | आई आणि आकाशवाणी

आई आणि आकाशवाणी

Next


माझ्या लेखन प्रेरणेचा खरा ऊर्जास्त्रोत माझी आई आणि आकाशवाणी आहे. माझी आई भारती कुळकर्णी माझ्या जन्माच्याही आधीपासून लेखन करत आली आहे. लेख, कथा, कविता, स्फूट लेखन ती लिहित असते. तिचा लेखनाचा गुण माझ्यात आला आहे. मला आठवतं, मी १९९० मध्ये अमळनेरच्या प्रताप कॉलेजला बीएच्या पहिल्या वर्षाला होतो. त्यावेळी कॉलेजमध्ये जळगाव आकाशवाणी केंद्राचे काही अधिकारी आले होते. त्यांनी युवा लेखक, कवींना आकाशवाणीच्या युववाणी कार्यक्रमासाठी लेखन करावे, असे आवाहन केले होते. त्यानुसार मी त्याग ही लघुकथा लिहिली.
लेखाची वा कथेची पहिली वाचक आईच असते. तिने माझी पहिली कथा वाचली. काही दुरुस्त्या सूचविल्या. विशेष महत्त्वाचं म्हणजे ही कथा मी आकाशवाणी या श्राव्य माध्यमासाठी लिहितो आहे, हे ध्यानात घेऊन ग्रंथ वा पुस्तकी भाषा तसंच बोलीभाषा यात खूप फरक असतो. आकाशवाणीच्या लेखनासाठी बोलीभाषेतून लेखन हवं, असं तिनं सांगितलं. मी संपूर्ण कथा बोलीभाषेतून लिहिली आणि ती युववाणीच्या ‘अक्षरवेल’साठी मंजूर झाली. नोव्हेंबर १९९० ला माझी पहिली कथा प्रसारीत झाली. माझी जन्मदात्री आणि आकाशवाणी माझी लेखन प्रेरणा म्हणता येईल. महाविद्यालयात असताना मिलिंद कुलकर्णी यांचे ‘लोकमत’मध्ये कॉलेजच्या बातम्या संकलन असलेलं ‘महाविद्यालयाच्या परिसरातून’ हे सदर चालवायचे. त्यात कॉलेजचा प्रतिनिधी म्हणून मी अमळनेरच्या प्रताप कॉलेजच्या बातम्या पाठवित असे. तेव्हापासूनच लेखन माझ्या जीवनाचं अविभाज्य अंग बनलं. १९९५ ला नाशिकला पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकलो. उपसंपादक म्हणून काम करू लागलो. लेखन हेच माझं ब्रेड अ‍ॅण्ड बटर बनलं. नाशिकला असताना सुप्रसिद्ध साहित्यिक तात्यासाहेब वि.वा. शिरवाडकर, ज्येष्ठ साहित्यिक वसंतराव कानेटकर यांच्या संपर्कात आलो. त्यांच्याकडून शिकायला मिळाले. त्यांच्यासोबत जळगावचा प्रवास म्हणजे साहित्यिक मेजवानीच होती. जळगाव येथे १९९७ ला आल्यावर जळगावची पत्रकारिता अनुभवली. २००१ मध्ये जैन इरिगेशनच्या प्रसिद्धी विभागात संधी मिळाली. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या संपर्कात आलो. त्यांचे लेखन कौशल्य होतेच. आजची समाज रचना... हे पुस्तक त्यांचे प्रसिद्ध झाले होते. त्यांच्याशी लेखक म्हणूनदेखील अनेकदा चर्चा व्हायच्या. ज्यांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाली अशा जोडप्यांची माहिती असलेलं अर्धशतकी लग्नगाठ वर्षभर चालविलं. त्याचं ‘अर्धशतकी लग्नगाठ’ हे पुस्तक जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या प्रेरणेने झालं. लेखक म्हणून बिरुदावली लागली. ‘ब्लॉगवाल्या आजीबाई’, ‘घडावा सुंदर अक्षर’, ‘ज्ञानवाणी’, ‘पासवर्ड सुंदर अक्षराचा’ असे पाहता पाहता पाच पुस्तकं नावावर झाले. शेतकरी आत्महत्या हा संवेदनशील विषय घेऊन ‘ह्या जन्मावर’ चित्रपटाचं कथा व पटकथा लेखनही केलं. या कार्याचा मला आनंदच आहे.

Web Title: Mother and AIR

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.