हृदयद्रावक घटना! अंघोळीसाठी गेलेल्या मायलेकासह मावशीचा तापी नदीत बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 12:16 IST2025-04-15T12:15:57+5:302025-04-15T12:16:26+5:30
मुलाला वाचवण्यासाठी आई आणि सोबतची महिला या दोघी त्याला वाचवण्यास गेल्या परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तेथील डोहात त्याही बुडाल्या.

हृदयद्रावक घटना! अंघोळीसाठी गेलेल्या मायलेकासह मावशीचा तापी नदीत बुडून मृत्यू
यावल - जळगावच्या यावल येथील तापी नदीवर अंघोळीसाठी गेलेला बालक, त्याची आई आणि मावशी या तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना यावल तालुक्यातील अंजाळे येथे घडली. या महिला गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गावात आल्या होत्या. ५ वर्षाच्या चिमुरड्यासह आई मावशीचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
या घटनेतील मृतांमध्ये ५ वर्षीय नकुल भिल, त्याची आई वैशाली भिल आणि मावशी सपना सोनवणे यांचा समावेश आहे. अंजाळे येथे घाणेकर नगरातील बादल लहू भिल यांच्याकडे रविवारी गोंधळाचा कार्यक्रम होता. यासाठी हे तिघे अंजाळे येथे आले होते. गोंधळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी नकुल, त्याची आई वैशाली आणि सपना या अंघोळ व कपडे धुण्यासाठी तापी नदीवर गेल्या होत्या. त्यावेळी नकुल हा पाण्यात खेळत असतानाच गटांगळ्या खाऊ लागला. त्याची आई आणि सोबतची महिला या दोघी त्याला वाचवण्यास गेल्या परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तेथील डोहात त्याही बुडाल्या.
यावल पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने सायंकाळच्या सुमारास तीनही जणांचे मृतदेह बाहेर काढले. तिथून यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणण्यात आले. रात्री ८ वाजता हे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवले.