आई-मुलाच्या मजबूत नात्याची गुंफण : श्यामची आई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 01:37 PM2018-12-03T13:37:14+5:302018-12-03T13:37:48+5:30
मातृहृदयी साने गुरुजींची २४ डिसेंबरला जयंती. यानिमित्त साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे महिनाभर विविध कार्यक्रम सुरू झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत या प्रतिष्ठानच्या कार्यवाह दर्शना पवार
साने गुरुजींच्या एकूण सर्व लिखाणात फारच नम्रता, शालिनता आहे, असे नेहमीच वाचताना लक्षात येते. गुरुजी कोणत्याही विषयावर लिहिताना, मत मांडताना स्वत:ला फार मोठा विचारवंत कधीच समजत नाही. त्यांच्या लिखाणात अहंभाव कुठेही नसतो.
गेल्या वर्षभरात पन्नासपेक्षा जास्त वेगवेगळ्या ठिकाणी लिंगभाव समानतेवर बोलायला गेली. कार्यशाळा घेतल्या. स्वत:ची ओळख देताना साने गुरुजी स्मारकाच्या कामात असते, असा परिचय असतो. राष्टÑ सेवादल व साने गुरुजी स्मारक म्हटले की तेथील स्थानिक आयोजक प्रश्न विचारतात, ‘ताई, साने गुरुजी व महिलांचा प्रश्न, स्त्री पुरुष समानतेचा, लिंगभाव समानतेचा काय संबंध?’
खरं तर असा प्रश्न आल्यावर पटकन ‘श्यामची आई’ हे पुस्तक डोळ्यासमोर येते. एवढे लोकप्रियता मिळवलेले हे पुस्तक आहे.
‘श्यामची आई’ हे पूर्ण पुस्तक हे स्त्री पुरुष माणूस भानाचे ट्रेनिंग देते. ‘श्यामची आई’ हे पुस्तक भावनिक नात्यासोबतच दृष्टिकोनही देते. आई मुलाच्या मजबूत नात्याची गुंफण आहे. तसेच ते स्त्री दास्य कसे कमी करायचे, हे कोडेदेखील सोडवते.
सिमोनच्या म्हणण्यानुसार, जशी स्त्री ही जन्मत: नसून घडवली जाते, तसाच कुटुंबातून पुरुषदेखील घडवला जातो. कोणताही पुरुष हा जैविकरीत्या हिंसात्मक किंवा वाईट व्यभिचारी नसतो. नाहीतर गांधी, बुद्ध, साने गुरुजी असे अनेक संवेदनशील महापुरुष घडलेच नसते. म्हणून ‘श्यामची आई’ नवीन दृष्टिकोनातून आपल्याला पुन्हा-पुन्हा समजून घ्यावे लागेल.
‘श्यामची आई’ ही मुलगा घडवताना लिंगानुसार कामाची विभागणी नाही शिकवत. श्याम मुलगा आहे तरी त्याला घराला झाडू मारणे, भांडी धुणे, जेवताना ताट आणणे, स्वयंपाक घरात काम करणे शिकवते.
स्त्री-पुरुषात फक्त शारीरिक भेद आहेत. स्त्री कनिष्ठ का पुरुष श्रेष्ठ हे दाखवण्यासाठी नाहीत किंवा लिंग समानता लिंग विषमता भलेही श्यामच्या आईला शब्दात मांडता आली नसेल पण वर्तन मात्र श्यामवर संस्कार करताना असेच होते.
मुलगा असला की त्याला कुटुंबातील लोक रडू देत नाही. त्याला बाहुली भांडे खेळला की बायल्या म्हटले जाते. स्वयंपाक घरात येऊ दिले जात नाही.
श्यामची आई ही मुलगा घडवताना त्याला संस्कारित करताना फार काळजी घेते. त्यांच्या हृदयात माया, ममता, प्रेम, दया, सेवाभाव, परोपकाराची भावना हे सर्वच फुलवण्याचा प्रयत्न करते. श्यामला (भूत दया) प्राणी मात्रांवर पण प्रेम करायला शिकवते. अमूक काम स्त्रीचे व अमूक काम पुरुषांचे असाही संवाद श्यामच्या आईचा कधीच नसतो. श्यामला म्हणून कोणतेही काम करताना कमीपणा वाटत नाही.
एकदा चोरी करणाऱ्या श्यामला तू मुलाची जात म्हणून आई माफ नाही करत, तर शिक्षा करते, रागवते. आपण मात्र कुटुंबात तू मुलाची जात तुला बारा खून माफ, तू काहीही केले तर चालते. ते श्यामची आई कधीच नाही करत. श्यामची आई ही साधारण महिला आहे. तरी त्यावेळच्या जातीव्यवस्थेला ती तिच्या ताकदीने मुलाच्या मनातून कमी करण्याचे काम करते.
आजीला टोपली उचलून दे म्हणते, श्यामला आलेले हे धाडस पोहण्यापासून तर देशासाठी तुरुंगात जाण्यापर्यंतचे, कामगार कष्टकरी चळवळीपासून ते पंढरपूर मंदिर सत्याग्रहापर्यंतचे आपण समजून घेऊ. देशाप्रतीची कृतज्ञता, देशबांधवांप्रतीचा जिव्हाळा, स्त्री प्रश्नांची जाण, मानवतेचा संघर्ष, शेतकºयांविषयी काळजी, वेगवेगळ्या राज्यातील बांधवांप्रतीचे बंधूप्रेम, संस्कृती समजून घेण्याचा ध्यास, आंतरभारतीचे स्वप्न, भारताला बलसागर करण्याचे स्वप्न, सर्वच आपल्याला समजून घ्यायला पाहिजे.
साने गुरुजींचा पुरुष असून हा मातृहृदयी माऊलीचा प्रवास आपण समजून घेऊ, कारण मातृहृदयी होण्यासाठी स्त्री शरीर म्हणून जन्म नाही घ्यावा लागत, किंवा फक्त स्त्री म्हणून जन्माला आले म्हणूनही मातृहृदयी होत नाही. मातृहृदय हे नैसर्गिक नाही, मातृहृदय हे जन्माला आलेल्या बाळामध्ये कुटुंबातून केलेल्या संस्कारातून निर्माण होते.
प्रत्येक कुटुंबातील संस्कारातून जर मातृहृदयी पुरुष निर्माण करता आला तर हिंसा आणि द्वेष सूड या भावना नष्ट होऊन आपल्या आजूबाजूचा स्त्री-पुरुषांचा प्रवास माणूस भानाकडे होईल व देशाचा नाही तर जगभराचा प्रवास मानवतेकडे होईल त्यात शंका नाही.
-दर्शना पवार, अमळनेर