हद्दीच्या वादात मुलाच्या मृतदेहाजवळ सहा तास रडली आई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 10:48 PM2020-01-27T22:48:20+5:302020-01-27T22:48:25+5:30
रेल्वेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू : शौचास गेला होता
जळगाव : शौचास गेलेल्या गजानन दलपत पाटील (२६, रा.हरिविठ्ठल नगर) या तरुणाचा धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने रविवारी रात्री मृत्यू झाला, मात्र ही घटना सोमवारी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, पोलिसांच्या हद्दीच्या वादात मृतदेहाजवळ सहा तास पोलीस घटनास्थळी पोहचले नाही, तितका वेळ आई मुलाजवळ रडतच बसली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन पाटील हा तरुण हातमजुरी करुन त्याचा व आई रुख्मीणीबाईचा उदनिर्वाह चालत होता. गेल्या वर्षीच गजाननच्या वडीलांचे अकाली निधन झाले असल्याने घरात दोन्ही माय-लेक इतकाच परिवार होता. दोन वेळच्या जेवणा पुरते दिवसभर मिळेल ते काम करायचे आणि जगायचे अशा चौकटीत गजानन तो जगत होता. रविवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास शौचास जातो म्हणुन आईला सांगून गजानन घरा समोरच रेल्वेरुळाच्या बाजुला गेला होता. रात्री घरी परतला नाही म्हणुन आई वाट पाहत होती. सकाळी घराजवळील रेल्वेरुळाजवळ मृतदेह पडल्याचे आढळून आल्याने नागरीकांनी धाव घेतली. मृतदेह गजाननचा असल्याचे ओळख पटल्यावर पोलिसांना घटना कळवण्यात आली. मात्र लोहमार्ग, तालुका व रामानंद नगर अशा तीन ठिकाणच्या पोलिसांमध्ये हद्दीचा वाद निर्माण झाला, त्यामुळे दुपारी अडीच वाजेपर्यंत मृतदेह घटनास्थळावरच पडून होता. शेवटी रामानंद नगर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.