मुलीच्या भेटीसाठी जाणारी आई जळगाव येथे टॅँकरच्या धडकेत ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 09:18 PM2017-12-19T21:18:06+5:302017-12-19T21:18:11+5:30
सासरी असलेल्या मुलीला जळगावहून दुचाकीने भेटण्यासाठी जात असलेल्या भाजीपाला विक्रेत्या यांच्या दुचाकीला दुधाच्या टँकरने मागून जोरदार धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्या
जळगाव : रावेर तालुक्यातील मस्कावद येथे सासरी असलेल्या मुलीला जळगावहून दुचाकीने भेटण्यासाठी जात असलेल्या भाजीपाला विक्रेत्या तथा फेरीवाला संघटनेच्या प्रदेश सदस्या मंगला रवींद्र चौधरी (वय ५०, रा.रामचंद्र नगर, लिलापार्क,जळगाव) यांच्या दुचाकीला दुधाच्या टँकरने मागून जोरदार धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्या तर त्यांचे पती रवींद्र चौधरी हे जखमी झाले. ही घटना राष्टÑीय महामार्गावरील नशिराबादनजीकच्या हातेड नाल्याजवळ मंगळवारी सकाळी ११ वाजता घडली.
अशी घडली घटना
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मंगला चौधरी व त्यांचे पती रवींद्र हे दोन्ही मंगळवारी सकाळी दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.जी.९१८७) विवाहित मुलगी रत्ना व उर्फ सुवर्णा हिच्या भेटीसाठी मस्कावद येथे जात असताना मागून जळगावकडून भरधाव वेगाने आलेल्या दुधाच्या टॅँकरने (क्र.एम.एच. ४० ए.के. १७५९ ) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात मंगला चौधरी या रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार बसला तर रवींद्र चौधरी हे डाव्या बाजूला फेकले गेले. त्यात ते जखमी झाले. मंगला चौधरी या जागीच गतप्राण झाल्या. चालकाने नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला अपयश आले. हा अपघात झाल्यानंतर टॅँकर सोडून त्याने पळ काढला.
निलोत्पलांनी हलविले रुग्णालयात
अपघात झाला त्याच वेळी भुसावळचे सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल हे जळगावला बैठकीसाठी येत होते. हा अपघात पाहून त्यांनी तातडीने नशिराबाद पोलिसांना घटनास्थळावर बोलाविले. पोलीस उपनिरीक्षक अशोक खरात,पोलीस कर्मचारी शांताराम तळेले, वासुदेव सोनवणे, गुलाब माळी व युनुस शेख यांनी जखमी रवींद्र चौधरी यांना डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात हलविले तर मंगला चौधरी यांना जिल्हा रुग्णालयात हलविले. टॅँकर ताब्यात घेण्यात आला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर चौधरी यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले.