सासू, नणंद म्हटली, तू जिवंत राहून उपयोग नाही; आणि विवाहितेने संतापात आत्महत्या केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:18 AM2021-08-29T04:18:30+5:302021-08-29T04:18:30+5:30

जळगाव : अंगावर सुरमा व कोडाचे डाग असल्याची माहिती लपवून ठेवत आमची फसवणूक केली. कार घेण्यासाठी तुझे आईवडील पैसे ...

Mother-in-law, Nand said, you are useless to stay alive; And the married woman committed suicide in anger | सासू, नणंद म्हटली, तू जिवंत राहून उपयोग नाही; आणि विवाहितेने संतापात आत्महत्या केली

सासू, नणंद म्हटली, तू जिवंत राहून उपयोग नाही; आणि विवाहितेने संतापात आत्महत्या केली

Next

जळगाव : अंगावर सुरमा व कोडाचे डाग असल्याची माहिती लपवून ठेवत आमची फसवणूक केली. कार घेण्यासाठी तुझे आईवडील पैसे देऊ शकत नाहीत. तू जिवंत राहून उपयोगाची नाही असे सततचे टोमणे असह्य झाल्याने दामिनी वैभव वैदकर (वय ३०) या विवाहितेने पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हरिविठ्ठल नगरातील कोठारी नगरात शुक्रवारी सायंकाळी घडली.

दामिनीला आत्महत्येस प्रवृत्त केले व कारसाठी छळ केला म्हणून पती वैभव रामचंद्र वैदकर, सासरा रामचंद्र काशिनाथ वैदकर, सासू ज्योती व नणंद नयना वैदकर या चौघांविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नणंद नयना वगळता तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. पती व सासरे दोघेही महवितरण कंपनीत नोकरीला आहेत. वैभव हा विद्युत निरीक्षक तर सासरा रामचंद्र हा वरिष्ठ व्यवस्थापक (प्रशासन विभाग) या पदावर कार्यरत आहे.

दामिनीचे वडील राजेंद्र रायभान धनगर (रा.भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ एप्रिल २०१८ रोजी दामिनी व वैभव यांचा भुसावळात विवाह झाला होता. रीतीरिवाजाप्रमाणे लग्नात २० तोळे सोने व ११ लाखांचा खर्च केला होता, तर साखरपुड्यात नवरदेवाला एक तोळ्याची सोन्याची अंगठी व एक लाखाचा खर्च केला होता. दामिनीला कोड आहे असे सांगून सासू ज्योती हिने साखरपुड्यातच लग्न मोडण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर समजूत घालून या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला होता. पती वैभव हा रत्नागिरी येथे नोकरीला असल्याने काही दिवस दामिनी सासूसोबत तेथे राहायला गेली. चार, पाच महिने सुरळीत संसार चालल्यानंतर तुझ्या वडिलांना हुंडा म्हणून मला कार दिली नाही तसेच लग्नात आमच्या नातेवाइकांना मानपान दिले नाही या कारणावरून छळ करायला सुरुवात झाली. अशातच २०२० मध्ये वैभव याची जळगावाला बदली झाली. संपूर्ण कुटुंब एकत्र राहात असताना पुन्हा तोच छळ सुरू झाला.

चहाला विलंब झाला अन् वादाला तोंड फुटले

शुक्रवारी सायंकाळी चहा ठेवण्यास विलंब झाल्याच्या कारणावरून नणंद नयना व सासू ज्योती यांनी ‘तुझे जिवंत राहून आम्हाला काहीच उपयोग नाही’ असे म्हणत मारहाण करायला सुरुवात केली. हा प्रकार तिने आईला फोनवरून सांगितला. पती व सासरे सकाळीच भांडण करून निघून गेलेले होते. त्यानंतर थोड्याच वेळाने साडेपाच वाजता दामिनीची प्रकृती बिघडल्याचा वडिलांना फोन आला. त्यांनी भुसावळ येथून जळगाव गाठले असता दामिनी हिने घरात पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. वारंवार छळ व मरून जा असे बोलल्यामुळेच दामिनीने आत्महत्या केली व त्यास पती, सासू, सासरे व नणंद हे जबाबदार असल्याची तक्रार वडिलांनी दिल्यावरून चौघांविरुध्द गुन्हा दाखल झाला. शनिवारी पती वैभव रामचंद्र वैदकर, सासरा रामचंद्र काशिनाथ वैदकर, सासू ज्योती या तिघांना अटक करण्यात आली. तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश शिंदे करीत आहेत.

Web Title: Mother-in-law, Nand said, you are useless to stay alive; And the married woman committed suicide in anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.