आईने बजावली शिक्षिकेची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 12:29 PM2017-05-14T12:29:51+5:302017-05-14T12:29:51+5:30
आई विमला सिंह यांची चिकाटी व चिद्द यामुळेच वेगवेगळ्या क्षेत्रात उच्चपदावर पोहचून शेवटी भारतीय पोलीस प्रशासन सेवेत दाखल झालो.
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 14 - जन्मदाती, पालनकर्ती व शिक्षक अशी तिहेरी भुमिका बजावलेल्या आई विमला सिंह यांची चिकाटी व चिद्द यामुळेच वेगवेगळ्या क्षेत्रात उच्चपदावर पोहचून शेवटी भारतीय पोलीस प्रशासन सेवेत दाखल झालो. आई आहे म्हणूनच माझीही शान आहे.अशा शब्दात अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आईविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
मातृदिनानिमित्त आईबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, आई उत्तर प्रदेशात असते. कामाचा प्रचंड ताण असतो.मात्र काहीही झाले तरी दररोज किमान 25 ते 30 मिनिटे आईशी बोलतोच, त्याशिवाय मन हलके होत नाही. आईशी बोलल्यानंतर ताण तणाव हलका होतो. वडीलांचे तीन भाऊ आहेत. सिंह कुटुंबात सर्वात मोठा मुलगा मीच आहे. उत्तर प्रदेश जन्मभूमी असली तरी संपूर्ण बालपण राजस्थानातच गेले आहे. मी खूप शिकावे व मोठे व्हावे ही आईची इच्छा होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आईच्या आग्रहाने अभियांत्रिकीच्या शिक्षणाकडे वळलो. त्यानंतर एमबीए केले तर भविष्यात त्याचे आणखी जास्त फायदे होतील असे आईला पटवून दिले. त्याला कुठलीही शंका कुशंका न घेता पटकन आईने होकार दिला. अभियांत्रिकी व एमबीए अशा दोन्ही क्षेत्राचा अनुभव असल्याने खासगी क्षेत्रात उच्च पदावर नोकरी मिळाली. बरेच दिवस ती नोकरी केली, मात्र पोलीस प्रशासनाचे आकर्षण होते. या क्षेत्रात करीअर करावे म्हणून आईला विचारले असता तिने तेव्हाही पटकन होकार दिला.आजर्पयत आईने कोणताही शब्द टाळला नाही व मी देखील त्या शब्दाचा जाण ठेवली आहे.