कामावरुन घरी परत आलेल्या आईला दार उघडताच दिसला मुलाचा मृतदेह
By Ajay.patil | Published: August 24, 2023 07:31 PM2023-08-24T19:31:11+5:302023-08-24T19:31:30+5:30
कांचननगरातील युवकाने घेतला गळफास: एक दिवसापुर्वीच उज्जैन, ओंकारेश्वरचे घेऊन आला दर्शन
जळगाव - हातमजूरीचे काम संपवून सायंकाळी घरी परतलेल्या आईवर, घर उघडताच गळफास घेत आत्महत्या केलेल्या मुलाचा मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ आल्याची घटना बुधवारी घडली. शहरातील कांचन नगर भागात २० वर्षीय युवकाने बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
पवन सुरेश राजपूत असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पवन हा गेल्या काही वर्षांपासून महापालिकेतील घंटागाडीवर कंत्राटी पध्दतीने कामाला होता. बुधवारी पवनने रजा घेतल्याने, तो कामावर गेलेला नव्हता. सकाळी जेवण केल्यानंतर आपल्या मित्रांसोबत काही वेळ घालविल्यानंतर सायंकाळी ५ वाजता घरी परतला. आई-वडिल कामावर गेल्यामुळे पवन हा घरी एकटाच होता. सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पवनने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
सायंकाळी ६ वाजता पवनची आई गीताबाई या घरी परतल्यानंतर दरवाजा उघडताच गळफास घेतलेला पवनचा मृतदेह दिसला. पवनचा मृतदेह पाहताच आईने जोरदार हंबरडा फोडला. पवनच्या आईचा आवाज ऐकल्यानंर शेजारील रहिवाशी पवनच्या घरात पोहचले, शेजाऱ्यांनी झालेल्या घटनेची शनिपेठ पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत, पवनचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला. त्याठिकाणी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आला.
पवनच्या पश्चात मोठी बहिण असून, बहिणेचे लग्न झाले आहे. आई गीताबाई या हातमजूरी करतात, तर वडील सुरेश राजपूत हे बाजार समितीत बारदानचे काम करतात. एकुलता एक मुलाचा मृत्यूने आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे. पवनच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार पवन एक दिवसापुर्वीच उज्जैन व ओंकारेश्वरला जाऊन आला होता. मात्र, पवनने घेतलेल्या टोकाचा निर्णयामुळे मित्रांनाही मोठा धक्का बसला आहे. पवनच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास परीष जाधव करत आहेत