आईने जागविला आत्मविश्वास
By admin | Published: May 14, 2017 12:38 PM2017-05-14T12:38:00+5:302017-05-14T12:38:00+5:30
आईने मला उमेद दिली. चांगला अभ्यास कर.. अभ्यासिकेत अधिक वेळ दे.., यश नक्की मिळेल.., असे तिने मायेने सांगत आत्मविश्वास जागविला..
चंद्रकांत जाधव / ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 14 - कृषी विषयातील पदवीमध्ये सवरेत्तम विद्यार्थी असताना मी तीनदा बँकांच्या परीक्षेत नापास झालो. निराशा आली. अशा स्थितीत मी राहुरी कृषी विद्यापीठातून घरी निघून गेलो.., आईने मला उमेद दिली. चांगला अभ्यास कर.. अभ्यासिकेत अधिक वेळ दे.., यश नक्की मिळेल.., असे तिने मायेने सांगत आत्मविश्वास जागविला.. तिच्या मार्गदर्शनानुसार अधिक मेहनत घेतली आणि बँकेत कृषी अधिकारी झालो. नंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही यश मिळाले. आज मी अतिरिक्त सीईओ पदार्पयत आईमुळेच पोहोचलो, असे गौरवोद्गार जि.प.चे अतिरिक्त सीईओ संजय मस्कर यांनी काढले.
मातृदिनानिमित्त आईबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना ते म्हणाले की, वडील साहेबराव मस्कर हे मूळचे आंबेदरे ता.सातारा येथील आहे. ते रयत शिक्षण संस्थेत शिक्षक होते. तर आई विमल मस्कर या जुनी 7 वी पास आहे. आई या घर व कुटुंब सांभाळायच्या. मस्कर यांना कल्पना घाडगे, सुरेखा पाटील व प्रतिभा बाबर पाटील या बहिणी आहेत. या तीन्ही बहिणीदेखील पदवीधर झाल्या. मस्कर यांचे प्राथमिक शिक्षण पुणे जिल्ह्यातील रांजणी ता.आंबेगाव येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण राहाता (नगर) येथे रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयात झाले. याच विद्यालयात त्यांचे वडील साहेबराव मस्कर हे मुख्याध्यापक होते. पुढे कृषी विषयातील पदवी पुणे कृषी महाविद्यालयात घेतली. नंतर पदव्युत्तर पदवीसाठी राहुरी कृषी विद्यापीठात संजय मस्कर हे प्रवेशित झाले.
वडील मुख्याध्यापक किंवा शिक्षक होते, पण घरचा अभ्यास आई विमल मस्कर याच घ्यायच्या. स्वत:ची कामे, घर झाडणे ही कामे आई करायला लावायची. तीने स्वावलंबी व्हायला शिकविले.
संजय मस्कर हे 10 वीत असताना अभ्यास सोडून खेळताना वर्ग शिक्षक यांना दिसले. दुस:या दिवशी वर्ग शिक्षकाने घरून चिठ्ठी आण. त्या शिवाय वर्गात बसू देणार नाही, असे सांगितले. घरी आई वडीलांनी चिठ्ठी दिली नाही. चार दिवस वर्गात प्रवेश दिला नाही. याच विद्यालयात वडील साहेबराव हे मुख्याध्यापक होते. पण शिक्षेपासून बचाव झाला नाही. 10 वीचे वर्ष वाया घालवू नये म्हणून आई रागावली. नंतर वडीलांनी मस्कर यांच्याकडून माफिनामा लिहून घेतला. त्यावर शिफारस केली नंतर वर्गात प्रवेश मिळाला. 1984ला अलाहाबाद बँकेत कृषी अधिकारी म्हणून नोकरी लागली. नंतर 1986मध्ये गटविकास अधिकारी म्हणून निवड झाली. या सर्व यशात जेवढा वडीलांचा वाटा आहे, तेवढा वाटा आर्इ विमल यांचा आहे, असे संजय मस्कर म्हणाले.