'मदर्स डे'च्या दिवशीच आईचा दगडाने ठेचून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 19:41 IST2024-05-12T19:41:38+5:302024-05-12T19:41:45+5:30
मुलगा व सूनेला अटक, प्लॉट विक्रीचा होता वाद

'मदर्स डे'च्या दिवशीच आईचा दगडाने ठेचून खून
बी.एस. चौधरी/ एरंडोल (जि.जळगाव) : आज रविवारी मदर्स डेच्या दिवशीच आईचा दगडाने ठेचून मुलगा आणि सुनेनेच खून केला. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना एरंडोल येथील केवडीपुरा भागात रविवारी पहाटे घडली. प्लॉट विक्रीच्या वादातून हा प्रकार घडला. मुलगा आणि सुनेस अटक करण्यात आली आहे. विमलबाई रोहिदास मोहिते (बेलदार)(६०) असे या मृत महिलेचे नाव आहे.
विमलबाई यांच्या राहत्या घराशेजारी त्यांच्या नावे असलेला प्लॉट मुलगा बापू रोहिदास मोहिते (४०) व सून शिवराबाई बापू मोहिते (३५) यांना विकायचा होता. या प्लॉटच्या विक्रीस विमलबाईंचा विरोध होता. त्यामुळे मुलगा आणि सून त्यांना त्रास देत द्यायचे आणि प्रसंगी मारहाणही करायचे. त्यामुळे विमलबाई ह्या मुसळी ता. धरणगाव येथील नातेवाईकांकडे काहीकाळ वास्तव्यास होत्या. समाजातील काही लोकांनी मुलगा व सूनेची समजूत घातली आणि विमलबाई यांना एरंडोल येथे एकत्र राहण्यास राजी केले.
रविवारी पहाटे साडेतीन वाजता मुलगा आणि सुनेने दगडाने ठेचून विमलबाई मोहिते यांचा निर्घृण खून केला. या घटनेबाबत मृत महिलेच्या बहिणीच्या मुलाने फिर्याद दिली. त्यावरुन एरंडोल पोलिस पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.