मातृदिन विशेष- कोरोना महामारीत ‘आशा’  झाल्या  ‘आई’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 12:37 AM2021-05-09T00:37:37+5:302021-05-09T00:39:03+5:30

कठीण स्थितीतही ग्रामीण भागात कोरोना फ्रंटलाईनर म्हणून उभ्या राहिल्या त्या आशा स्वयंसेविका. वाडी - वस्तीतील प्रत्येक कुटूंबासाठी जणू त्यांनी आईची भूमिका निभावली आहे.

Mother's Day Special - 'Mother' becomes 'hope' in Corona epidemic | मातृदिन विशेष- कोरोना महामारीत ‘आशा’  झाल्या  ‘आई’

मातृदिन विशेष- कोरोना महामारीत ‘आशा’  झाल्या  ‘आई’

Next
ठळक मुद्देवाडी-वस्तीत कुटुंबांसाठी पायपीटकोविड फ्रंटलाईनर म्हणून करताय काम

चाळीसगाव  : कोरोनाचे रुप इतके कराल आहे की, त्याने नात्यांच्या घट्ट साखळ्या तोडून टाकल्या. रक्ताने जोडलेली नाळही खंडीत झाली. ग्रामीण व शहरी भागातील 'आशा' स्वयंसेविका मात्र कोरोना फायटर होत आईच्या मायेनं जनतेची काळजी घेत आहे. कोरोनाच्या महामारीत त्यांच्यातील 'आई'चे रुप खरोखरच प्रकर्षाने समोर आले आहे. स्वतःची पर्वा न करता त्या वाडी - वस्त्यांमध्ये आरोग्याचा जागर करीत जणू  या कुटुंबीयांची आईच बनल्या आहेत.  

वर्षभरापूर्वी आलेल्या कोरोनाने जगाचे रहाटगाडे थांबविले. जणू क्षणभर काळाचीही पावले थांबून रहावे, असे हे आक्राळ - विक्राळ संकट. यासंकटाने नात्यांची घट्ट वीण उसवली. आई - लेकराची ताटातूट केली. हट्टेकट्टे तरुणही गिळले. नागरिक घरात कोंडले गेले. बाहेर पडणारं पाऊल मृत्युचे कारण ठरु लागले. मात्र याच वणव्यात आरोग्य यंत्रणा पाय रोवून उभी राहिली. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा 'सलाईनवर' असल्याचे वास्तव वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. अशा कठीण स्थितीतही ग्रामीण भागात कोरोना फ्रंटलाईनर म्हणून उभ्या राहिल्या त्या आशा स्वयंसेविका. वाडी - वस्तीतील प्रत्येक कुटूंबासाठी जणू त्यांनी आईची भूमिका निभावली आहे.

गेल्यावर्षी शिवनेरीकडून 'भाऊबीज' भेट
गेल्या वर्षी  आमदार मंगेश चव्हाण प्रेरीत शिवनेरी फाऊंडेशनने याआशांची 'आई - बहिण' अशा दोघाही रुपांची पूजा केली. दिवाळीच्या पर्वावर एका जाहिर सोहळ्यात 'आशां'ना माहेरची भाऊबीज भेट देऊन गौरविले. समाजातील १३०० हून अधिक गरजू भगिनींना फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांनी 'साडी - चोळी' देऊन त्यांचे एकप्रकारे माहेरपण साजरे केले होते. त्यामुळे आशा स्वयंसेविकांना नवी उभारीच मिळाली.

मानधन अल्प, कामाचा व्याप मोठा
कोरोनाकाळात गावोगावच्या 'आशां'नी गरोदर मातांसह स्तनदा मातांची काळजी घेतली. नवजात बालकांच्या अत्यावश्यक लसीकरणाचा टप्पा सांभाळला. एवढचं नाही तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना महामारीत घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याचे सर्वेक्षण केले. आजारी नागरिकांना धीर दिला. शासकीय योजनांची माहितीही घरोघरी पोहचवली. मे हीटच्या रणरणत्या उन्हात देखील त्यांची पायपीट थांबलेली नाही. चाळीसगाव शहर व तालुक्यात ३२५ आशा स्वयंसेविका आहे. त्यांना ठराविक पगार नाही. जेवढे काम कराल. तेवढेच मानधन मिळते. अर्थात कामाचा व्याप मोठा आणि मानधन तोडके. मात्र तरीही त्यांच्यातील 'आई'ची माया आटलेली नाही, हे विशेष.


लसीकरणाच्या ब्रॕड अॕम्बेसिंडर
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयी ग्रामीण भागात मोठे समज - गैरसमज आहे. विशेषतः वयस्कर मंडळी लस घेण्यासाठी फारशी धजावत नाही. कधीही इंजेक्शन टोचून न घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणासाठी तयार करणे तसे अवघडच. तथापि हार मानतील त्या 'आशा' कश्या. सद्यस्थितीत ग्रामीण भागातील लसीकरणचा आकडा वाढतोयं. त्याच्या मुळाशी आशा स्वयंसेविकांची झोकून देणारी मेहनत आहे. ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंध लसीकरणाच्याही 'आशा' ब्रॕड अॕम्बेसिडर ठरत आहे.

 
कोरोनातील मृत्युची भीती झुगारुन आम्ही काम करतोयं. ग्रामीण भागात काम करतांना अडचणी येतात. मात्र यावर मात करीत महामारीतील हे युद्धच लढतोयं. नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहे. गेल्यावर्षी आमच्या कष्टाची जाणीव ठेऊन शिवनेरी फाऊंडेशनने पाठीवर हात ठेवला होता. लोंढे प्राथ.आरोग्य केंद्रातील डॉ. संदीप निकम, आरोग्य सेविका यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरते आहे. ग्रामपंचायतीचेही सहकार्य मिळत आहे. कधी आई तर कधी बहिण होऊन गावातील कुटूंबाची काळजी घेत आहे.
- रेखा पांडुरंग तिरमली
आशा स्वयंसेविका तिरपोळे, ता. चाळीसगाव.
 

Web Title: Mother's Day Special - 'Mother' becomes 'hope' in Corona epidemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.