मातृ दिन विशेष- मुुलांना शिकवून मोठे करायचं-मुक्या व बहिऱ्या उषाबाईला आशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 12:22 AM2021-05-09T00:22:59+5:302021-05-09T00:24:20+5:30
मुकी बहिरी आहे म्हणून हिंमत न हारता हिमतीने मोलमजुरी करत मुलांना शिकवून मोठे करायचे हे स्वप्न उराशी बाळगले आहे.
प्रमोद ललवाणी
कजगाव, ता.भडगाव : जिद्द व मेहनतीच्या बळावर मुलांना घडविण्यासाठी मुकी व बहिरी असलेल्या कजगाव येथील उषाबाई दीपक सोनवणे या मोलमजुरीची कामे करणाऱ्या मातेने मनाशी एकच जिद्द बांधली आहे ती म्हणजे मुलांना शिकवून मोठे करणे. अपार कष्ट करून स्वप्न बघणाऱ्या उषाबाईस शासन स्तरावरून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रत्येक ठिकाणी करावी लागते तडजोड
स्वत: मुकी व बहिरी यामुळे समाजात हालअपेष्टा होतात. मनाशी बांधलेली स्वप्ने अपंगत्वामुळे साकार होत नाहीत, प्रत्येक ठिकाणी तडजोड करावी लागते. या सर्वच मार्गावरून मार्गक्रमण करत असलेल्या उषाबाई मात्र मुलाच्या उज्वल भविष्याचे स्वप्न साकार करण्यासाठी अपार मेहनत घेत आहे. मुकी बहिरी आहे म्हणून हिंमत न हारता हिमतीने मोलमजुरी करत मुलांना शिकवून मोठे करायचे हे स्वप्न उराशी बाळगले आहे.
उषाबाई जन्मत: मुकी व बहिरी
दोंडाईचा येथील सुदाम इशी यांना एक मुलगा व दोन मुली. यात एक मुलगा व एक मुलगी हे मुके व बहिरे आहेत. यात अजय हा दोंडाईचा येथे सलून दुकान चालवतो तर उषाबाईचे २०१० मध्ये कजगाव येथील दीपक सोनवणे यांच्याशी लग्न झाले. दीपकची सलूनची लहानशी टपरी. त्यातच उषाबाईकडून लागणारा हातभार. यातूनच संसाराची गाडी बऱ्यापैकी रुळावर आहे. मात्र वाट्टेल ते करून मुलं घडवायची, त्यांना शिक्षण देऊन मोठं करायचं हे ध्येय मनाशी पक्के करत मुकी व बहिरी असलेली उषाबाई साऱ्या गोष्टी इशाऱ्याने सांगते. ही भाषा उषाबाई जेथे काम करते तेथील साऱ्या सदस्यांना अवगत झाली आहे. त्यांचे इशारे साऱ्यांना समजू लागल्याने एक मोठं पाठबळ मिळत आपली भाषा साऱ्याना कळू लागल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसते. तिचे शिक्षण इयत्ता सातवीपर्यंत दोंडाईचा येथील मूकबधिर शाळेत झाले आहे.
दोन्ही मुलं मुके व बहिरे नसल्याचा आनंद
मुकी व बहिरी असली तरी बुद्धिकौशल्यात हुशार असलेल्या उषाबाईस दोन मुलं. एक मुलगा साई तिसरीमध्ये शिकतो तर दुसरा मुलगा गणेश पहिलीमध्ये शिकतोय. दोन्ही मुलं आपल्याप्रमाणे मुके व बहिरे नसल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर कायमच ओसंडून वाहत असतो कारण मुकी व बहिरीच्या वेदना भोगल्या असल्यामुळे दोघे मुले यापासून दूर असल्याचे मोठे समाधान तिच्या चेहऱ्यावर आहे. याच समाधानाच्या बळावर वाट्टेल ते कष्ट करून मुलं घडवायची हिच जिद्द मनाशी बाळगत अपार मेहनत घेत असलेल्या या मातेस शासन स्तरावरून लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मदत मिळाल्यास मोठा हातभार लागेल.