मातेच्या दुधाची बॅँक आता जळगावातही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 10:50 AM2019-03-10T10:50:01+5:302019-03-10T10:50:07+5:30
६ महिन्यांपर्यंत दूध साठविण्याची आहे क्षमता
सागर दुबे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : दूध मिळाले नाही म्हणून द्रोणाचार्याच्या पत्नीने पिठात पाणी मिसळले आणि दूध म्हणून अश्वत्थाम्याला दिले, ही महाभारतातील गोष्ट अनेकदा ऐकलेली आहे. मात्र, आधुनिक काळात असा कुणी अश्वत्थामा राहू नये आणि नवजात अर्भकांना मातेचे दूध मिळावे, यासाठी 'माता अमृत' नामक मातेच्या दुधाची बँक रोटरी क्लब जळगाव वेस्ट आणि दी जळगाव पीपल्स् बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टच्या माध्यमातून शहरातील राजर्षी श्री छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात उभारण्यात आली आहे़ ही बँक अत्याधुनिक उपकरणांची असून यातील ‘किमी’ नामक उपकरणात सहा महिन्यांपर्यंत मातेचे दूध साठवून ठेवण्याची क्षमता आहे.
नवजात बालकांसाठी मातेचे दूध हा सर्वांत चांगला आहार असतो. कित्येकदा मातेला पुरेसे दूध नसल्यानेही अर्भकांना बाहेरचे दूध द्यावे लागते. मात्र, इतक्या कमी वयाच्या मुलांना बेबी फूड किंवा अगदी गाईचे दूध देणेही धोकादायक असते. त्यातून भविष्यात या मुलांना दमा, कॅन्सर किंवा मधुमेहासारखे आजार होऊ शकतात. योग्यवेळी दूध न मिळाल्याने नवजात अर्भकांचे मृत्यू होण्यासारखे प्रकार घडत असतात.
आफ्रिकन मुलीचे नाव
माता दुधावर प्रक्रिया करणारी तसेच त्याचे सहा महिन्यांपर्यंत स्टोअर करणारी अर्थात साठवणूक करून ठेवणारी किमी नामक उपकरणाचे पुण्यातील श्रीयश इलेक्ट्रो मेडीकल्स् या कंपनीचे मालक तथा पुणे रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष सुधीर वाघमारे संशोधन केले आहे़ दरम्यान, काही वर्षापूर्वी वाघमारे यांचे अमेरिका येथील मित्र नवजात अर्भक तज्ञ डॉ.उदय देवासकर यांच्याकडे आफ्रिकन महिला आली़ त्यावेळी तपासणी दरम्यान गर्भात मुलगी असल्याचे कळताच त्या मुलीचे तेव्हाच किनबर्ली हे नाव ठेवण्यात आले़ मात्र, प्रसुतीनंतर तीन दिवसात या महिलेचा मृत्य झाला़ त्यामुळे किनबर्ली हिला मातेच्या दुधाची आवश्यकता होती़ हा किस्सा देवासकर यांनी वाघमारे यांना सांगितल्यानंतर नवजात अर्भकांना मातेचे दुध मिळावे व सुदृढ आरोग्य रहावे, यासाठी वाघमारे यांनी हे संशोधन केले.
काय आहे ‘माता अमृत’
रक्तदानाप्रमाणे प्रसुत महिला दूध दान करुन ते या ‘माता अमृत’ पेढीत दूध साठवून ते गरजवंत बालकाला पुरविले जाते. या पेढीत सहा महिन्यापर्यंत दूध सुरक्षित राहू शकते. ज्या बालकांची आई काही कारणामुळे बाळाला दूध पाजू शकत नाही, त्या बाळाला येथून दूध उपलब्ध होईल. या केंद्रामध्ये दोन प्रकारच्या महिला दूध दान करतात. एक स्वेच्छेने आणि दुसऱ्या ज्या महिला आपल्या मुलांना दूध पाजू शकत नाही. अशा मातांना दूध दान करणे हा उत्तम पर्याय आहे.
अमेरिकेनंतर पुणे आणि जळगावातच 'किमी'... किमी हे उपकरण अमेरिकेत आहे.सुधीर वाघमारे यांनी संशोधन करुन ते उपकरण पुण्यात सुरु केले. जळगावचे डॉ.राजेश पाटील यांच्या विनंतीवरुन आता जळगावातही ते सुरु झाले. डॉ.पाटील यांनीच या उपकरणाला ‘माता अमृत’ हे नाव दिले. याआधी देखील डॉ.पाटील यांच्याविनंतीवरुन जिल्हा रुग्णालयातील बालरुग्ण कक्षात अतिशय महागडे यंत्र आणण्यात आले आहे.
रक्तदानाप्रमाणे माता दूध दान करु शकतात. त्याचे कोणतेही दुष्परीणाम नाहीत. दान केलेले दूध रक्ताप्रमाणे लगेन नवीन तयार होते. त्यामुळे मातांनी निसंकोचपणे दूध दान करुन बालकांना जीवदान द्यावे.
-डॉ.राजेश पाटील, बालरोग तज्ज्ञ