जळगावात कारवर दुचाकी आदळून विद्युत सहायक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:58 AM2019-06-12T11:58:15+5:302019-06-12T12:02:12+5:30
मित्राला सोडून घरी परत येत असताना दुचाकी कारवर आदळून अविनाश बापु पाटील (३०, मुळ रा.मोहाडी, ता. धुळे, ह.मु.अयोध्या नगर, जळगाव) हा तरुण विद्युत सहायक जागेवरच ठार झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री बारा वाजता महामार्गावर विद्युत कॉलनीजवळ घडली.
जळगाव : मित्राला सोडून घरी परत येत असताना दुचाकी कारवर आदळून अविनाश बापु पाटील (३०, मुळ रा.मोहाडी, ता. धुळे, ह.मु.अयोध्या नगर, जळगाव) हा तरुण विद्युत सहायक जागेवरच ठार झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री बारा वाजता महामार्गावर विद्युत कॉलनीजवळ घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश पाटील हा नवीन एमआयडीसी दक्ष १ या ठिकाणी विद्युत सहायक म्हणून नियुक्तीला होता. मंगळवारी रात्री तो दुचाकीने (क्र.एम.एच.१९ ए.एस.७७१०)मित्राला सोडायला शिव कॉलनी परिसरात गेलेला होता. तेथून परत येत असताना रात्री १२ वाजता विद्युत कॉलनीजवळ समोरुन येणा-या कारवर (क्र.एम.एच.१९सी.यु.८९२१) दुचाकी आदळली. दोन्ही वाहने वेगात असल्याने वाहनांचा चुराडा होण्यासह डोक्याला गंभीर मार लागल्याने अविनाश जागेवरच गतप्राण झाला. दरम्यान, सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मोहाडी, ता.धुळे येथे अंत्यसंस्कारासाठी जळगावचे कर्मचारीही सोबत रवाना झाले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात नोंद करण्यात आली. प्राथमिक तपास हवालदार विनोद शिंदे करीत आहेत.
दोन वर्षापूर्वीच लागला नोकरीला
अविनाश हा दोन वर्षापूर्वी १७ मे २०१७ रोजी महावितरणमध्ये विद्युत सहायक म्हणून नोकरीला लागला होता. अविवाहित असल्याने अयोध्या नगरात भाड्याने खोली घेऊन वास्तव्याला होता. मोहाडी, धुळे येथे वडील रिक्षा चालवतात. त्याच्या पश्चात आई, वडील व एक बहीण आहे. अविनाश हा एकुलता होता. अविनाश यांचे मुळ गाव पाचोरा तालुक्यातील आहे, मात्र रोजगारासाठी ते मोहाडी, ता.धुळे येथे स्थायिक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.