ंआॅनलाइन शिक्षणापुढे अडचणींचा डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 04:25 PM2020-08-04T16:25:50+5:302020-08-04T16:25:56+5:30
अनेकांकडे स्मार्टफोन नाही : ग्रामीण भागात नेटवर्कचा उडाला बोजवारा
जामनेर : तालुक्यात जिल्हा परिषद व खासगी अनुदानीत अशा एकूण २४६ शाळा आहेत. त्यातील केवळ १३८ शाळा डिजिटल आहेत. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आॅनलाइन शिक्षणावर भर देण्यात येत असताना शाळांचीच अशी स्थिती व त्यात ग्रामीण भागातील बऱ्याच विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्याने आॅनलाईन शिक्षणाचा फज्जा उडाला आहे.
निम्म्या शाळाच डिजिटल
तालुक्याचा शैक्षणिक क्षेत्राचा नावलौकिक आहे. त्यामुळे येथे येणाºया विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. दरम्यान तालुक्यात जिल्हा परिषदेच्या २०८, खाजगी अनुदानित ३८ अशा एकूण २४६ शाळा आहेत त्यापैकी केवळ १३८ शाळा डिजिटल आहेत.
या शाळांमध्ये २ हजार ३०० शिक्षक कार्यरत असून सन २०१९ - २० या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे ६५ हजार विद्यार्थी व विद्यार्थिनी होते. दरम्यान शाळा सुरू नसल्या तरी आॅनलाईन शिक्षण सुरू आहे, त्याचा फारसा फायदा मात्र ग्रामीण भागाला नाही.
स्मार्टफोन कोठूण आणायचा ?
टाळेबंदीमुळे हाताचा रोजगार गेला व अद्यापही हाताला काम नाही अशा परिस्थितीत कुटुंबांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा व रोज पोट कसे भरायचे? अशी भ्रांत पडली आहे. अशा परिस्थितीत आॅनलाईन शिक्षणासाठी मुलांना स्मार्टफोन कोठून उपलब्ध करून द्यायचा? असा प्रश्न असताना शासनाने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचाही विचार करायला हवा, असे मत पालकवर्गातून व्यक्त होत आहे.