बाजूला सरका, बाजूला सरका, बसचे ब्रेक फेल झालेय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:16 AM2021-03-08T04:16:33+5:302021-03-08T04:16:33+5:30
पाचोरा आगाराची (बस क्रमांक एम एच १४, बीटी २१७८) ही बस रविवारी सकाळी जळगावला आल्यानंतर, बसवरील चालक जाकीर ...
पाचोरा आगाराची (बस क्रमांक एम एच १४, बीटी २१७८) ही बस रविवारी सकाळी जळगावला आल्यानंतर, बसवरील चालक जाकीर पठाण हे जळगावहून पुन्हा प्रवासी घेऊन १०.१५ वाजता पाचोऱ्याकडे निघाले. मात्र, जळगाव आगार सोडल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच स्वातंत्र्य चौकात या बसचे ब्रेक फेल झाले. ब्रेक लागत नसल्यामुळे पठाण यांची पायाखालची जमीनच सरकली. बसच्या पुढे दोन रिक्षा धावत असताना, जाकीर पठाण यांनी तत्काळ प्रसंगावधानता राखून जोराने हॅण्डब्रेक दाबून गाडी थांबविली. यावेळी चाकांचे घर्षण होऊन, मोठा आवाज झाल्याने बसमधील प्रवाशांचींही एकच धावपळ उडाली. यावेळी चालक पठाण यांनी बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हॅण्डब्रेक लावून गाडी थांबविल्याचे सांगितल्यावर, गाडीतील सुमारे ४५ प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. तसेच जीव वाचविल्याबद्दल पठाण यांचे आभार मानून, त्यांच्या प्रसंगावधानतेचे कौतुकही केले.
इन्फो
बसमधील प्रवासी दुसऱ्या बसने रवाना
या बसचे ब्रेक फेल झाल्यानंतर, या घटनेची माहिती तत्काळ जळगाव आगार प्रशासनाला देण्यात आली. आगारातील कार्यशाळेतील कर्मचारी येईपर्यंत, ब्रेक फेल झालेल्या बसमधील प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. यावेळी जळगावहून-पाचोऱ्याकडे जाणाऱ्या बसमध्ये या सर्व प्रवाशांना बसवून पाचोऱ्याकडे रवाना करण्यात आले.
इन्फो
पुन्हा ब्रेक फेल झाले..
घटनेची माहिती मिळताच जळगाव आगाराच्या कार्यशाळेतील दोन कर्मचारी बस आगारात आणण्यासाठी तत्काळ स्वातंत्र्य चौकात पोहोचले. यावेळी त्यांनी ब्रेकचे तांत्रिक काम करून, एक कर्मचारी स्वत: ही बस चालवून जळगाव आगारात आणायला लागले. मात्र, यावेळी पुन्हा या बसचे ब्रेक फेल झाले. ब्रेक लागत नसल्याचे लक्षात येताच, या बसमध्ये बसलेल्या चालक जाकीर पठाण यांनी धावत्या बसमधून खाली उडी मारली आणि अपघात टाळण्यासाठी थेट जीवाची पर्वा न करता या बसच्या पुढे धावत सुटले.
इन्फो :
अन पठाण बसपुढे पळत सुटले...
स्वातंत्र्य चौकातून जळगाव आगारात बस आणताना, या बसचे ब्रेक पुन्हा फेल झाल्यावर जाकीर पठाण स्वातंत्र्य चौकापासून ते जळगाव आगारापर्यंत बसच्या पुढे वेगाने धावत होते. रस्त्यावरील नागरिकांना बाजूला सरका, बाजूला सरका, बसचे ब्रेक फेल झाले आहेत, असा आवाज देऊन नागरिकांना बाजूला करत होते. त्यांचा हा मोठमोठ्याने आवाज ऐकून रस्त्यावरच एकच गर्दी झाली होती. विशेष म्हणजे हा प्रकार पाहण्यासाठी या बसच्या मागे व रस्त्याच्या आजूबाजूला नागरिकांनी एकच गर्दी केल्यामुळे रस्त्यावर एकच गोंधळ निर्माण झाला होता. या चालकाच्या मागे ही बस जळगाव आगारात आल्यानंतर या ठिकाणीही प्रवासी तत्काळ बाजूला झाले. शेवटी ही बसस्थानकातच संरक्षण भिंतीला धडकून, जागेवरच थांबली. हा प्रकार पाहण्यासाठी रस्त्यावरील नागरिकांनी बसस्थानकात धाव घेऊन, एकच गर्दी केली होती.
इन्फो :
वाहकाला चक्कर आल्याने, रुग्णालयात केले दाखल
अपघात टाळण्यासाठी बस पुढे धावणाऱ्या जाकीर पठाण यांना ही बस संरक्षण भिंतीला धडकल्यानंतर, अचानक चक्कर आली. जीव तोडून बसपुढे धावल्यामुळे, त्यांना दम लागला होता. यावेळी स्थानक प्रमुख मनोज तिवारी यांनी पठाण यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करून, दुपारनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.