सफाई कामगारांचे आंदोलन अखेर मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 05:55 PM2018-09-12T17:55:09+5:302018-09-12T17:56:37+5:30
बोदवड : पगारवाढीचा तिढा अखेर सुटला, बाराव्या दिवशी सफाई सुरू
बोदवड, जि.जळगाव : किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्याचे ठरल्यानंतर येथील नगरपंचायतीच्या सफाई कामगारांनी बाराव्या दिवशी आपले ‘काम बंद’ आंदोलन मागे घेतले आणि बुधवारी सकाळपासून कामगारांनी शहरात सफाईच्या कामाला सुरुवात केली. यासाठी कामगार व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर यशस्वी मध्यस्थी निघाल्यानंतर कामगारांसोबतच बोदवडवासीयांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
बोदवड ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतरही नगरपंचायतीतील सफाई कामगारांना ग्राम पंचायतीतील कामगारांप्रमाणे ८० रुपये प्रती दिन वेतन मिळत होते. वेतनवाढ करावी मागणीसाठी नगरपंचायतीतील सर्व ५४ सफाई कामगारांनी १ सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन पुकारले होते.
या दरम्यान मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी कामगारांना अत्यावश्यक सेवा म्हणून कामावर तत्काळ हजर होण्याविषयीही नोटिसा बजावल्या होत्या. परंतु कामगार आपल्या भूमिकेवर ठाम होते. यातूनच साफसफाई होत नसल्याने शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. एवढेच नव्हे तर खुद्द नगरपंचायत कार्यालय परिसरदेखील घाणीच्या साम्राज्याने वेढला गेला होता.
यावर मार्ग काढण्यासाठी कामगार व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने जळगाव येथे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांची भेट घेतली. कामगारांनी आपली बाजू मांडली. जिल्हाधिकाºयांनी मध्यस्थी केली व किमान वेतन कायद्यानुसार कामगारांना आठ हजार रुपये वेतनवाढ देण्याविषयी सूचित केले. या अनुषंगाने नगरपंचायतीत ठराव करावा, असेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले. यावर नगराध्यक्षा मुमताजबी बागवान, नगरसेवक व मुख्याधिकाºयांनी होकार दिला आणि सफाई कामगारांचा वेतनवाढीचा तिढा सुटला.
या वेळी सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवक तसेच कामगारांचे प्रतिनिधी मुकादम मनोज छपरीबंद, जवरी मिलादे आदी उपस्थित होते.
यशस्वी मध्यस्थी निघाल्यानंतर सफाई कामगारांनी १२ सप्टेंबरपासून शहरातील सफाईच्या कामास सुरुवात केली. गेल्या ११ दिवसात शहरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. यामुळे कामगारांसोबतच शहरवासीयांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
दरम्यान, कामगार बांधवांचे दैवत असलेला श्री रामदेवजी बाबा उत्सवही याच काळात आहे. हा उत्सव ११ ते १९ सप्टेंबर दरम्यान साजरा करण्यात येत आहे आणि नेमका याच काळात पगार नसल्याने कामगारांचेही हाल होत होते. परंतु उत्सव काळात वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लागल्याने कामगारांनी आपल्या दैवताप्रती ऋण व्यक्त केले.