पाडळसरे धरणस्थळी शेतकऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:32 AM2018-06-29T00:32:10+5:302018-06-29T00:32:37+5:30
पूर्वसूचना न देता पाईपची प्लेट काढण्यास विरोध : लेखी आश्वासनानंर आंदोलन स्थगित
अमळनेर, जि.जळगाव : गेल्या २० वर्षांपासून अपूर्णावस्थेतील पाडळसरे धरणात १३९ तलांकापर्यंत झालेल्या कामामुळे साठणारा दोन टीमसी जलसाठा उन्हाळ्यात कायम रहावा म्हणून पाणी उपसा करून बागायती करणाºया परवानाधारक शेतकºयांकडून गुरुवारी पाडळसरे धरणस्थळी गेट नंबर १२ वर आंदोलन छेडण्यात आले. मात्र पाणी उन्हाळ्यात कमी होणार नसल्याचे लेखी पत्र मिळाल्याशिवाय गेट नंबर १२ व १८ चे पाईपांच्या प्लेट काढू देणार नाहीत या अटीवर ठाम होते. याबाबत उपकार्यकारी अभियंता व्ही.एस.ठाकूर यांनी पाणी पातळीवर परिणाम होणार नाही व पाईप मोकळे केले तरी पाणी उपलब्धतेसाठी उपाययोजना करू, असे लेखी पत्र दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले.
पाडळसरे धरणाचे गेल्या २० वर्षांत एकूण २३ वक्राकार गेट बसवण्याच्या काँक्रिट कामाचे १३९ तलांकापर्यंत काम करण्यास आले आहे. त्यात गेट नंबर १२ व १८ च्या मध्ये १३४ च्या पातळीवर दोन्ही प्रस्तावात एक मीटर रुंदीचे पाईप हे भविष्यात काम करण्यास अडचण येणार नाही म्हणून पाणी काढण्यासाठी टाकण्यात आले आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांपासून दरवाजाचे कोणतेच काम करण्यास आले नसून, साईडवॉल व संरक्षण भिंतीचे कामावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. गेल्या मार्च महिन्यापासून धरणाचे किरकोळ बंद आहे. मात्र पावसाळा लांबल्याने धरणातील १२.९७ दशलक्ष घनमीटर जलसाठ्यातून शेकडो एकर शेतजमीन ओलिताखाली येवून बहुतांश शेतकºयांना पाणी उपसा करण्यास परवाना दिला. यामुळे ऊस, केळी, पपई ही बागायती पिके लागवड केली असून, डाळींब व पेरू ही बारमाही फळपिके लागवड केली आहेत. धरणाच्या जलाशयात उन्हाळ्यात पाण्याचा अत्यल्प साठा उपलब्ध असतो. या दोन पाईपची प्लेट काढल्यावर १३९ तलांकावर राहणारे पाणी १३४ मीटर तलांकावर आल्यास पाच मीटर पाणी पातळी कमी होईल. सर्व बागायती पिके उन्हाळ्यात धोक्यात येतील. यासाठी संबंधित विभागाकडून पिके लागवड आधी पूर्वसूचना न देता प्लेट काढण्याचा घाट ठेकेदाराच्या व्यवस्थापकाने केल्याने शेतकºयांनी पाहिले व गावातील अनेक शेतकरी धरणस्थळी पोहोचले आणि अचानक आंदोलन पुकारण्यात आले.
याबाबतीत आंदोलक शेतकरी व कार्यकारी अभियंत्या रजनी देशमुख यांच्यात लेखी आश्वासन देऊन उन्हाळ्यात पाणीसाठा उपलब्ध राहण्यास अडचण येणार नाही म्हणून बोलणे झाले. मात्र शेतकरी लेखी आश्वासनावर ठाम राहिल्याने शेवटी उपकार्यकारी अभियंता व्ही.एस.ठाकूर यांच्या सहीचे लेखी आश्वासनाचे पत्र शाखा अभियंता स्वामी यांनी धरणस्थळी आंदोलक शेतकºयांना आणून दिले. तेव्हा आंदोलन स्थगित करण्यात आले. या आंदोलनात रणछोड पाटील, उपसरपंच प्रभाकर पाटील, माजी सरपंच रमेश पाटील, भूषण पाटील, संभाजी पाटील, चंद्रकांत पाटील, मनोज पाटील, विकास पाटील, नितीन पाटील, संदीप पाटील, गोपाल पाटील, भिकन पाटील, संजय पाटील, राकेश पाटील, चिंतामण पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
भविष्यात आॅक्टोबरनंतर प्रस्तावाचे काम करण्यास वरिष्ठांकडून सूचना आल्याने तात्पुरत्या स्वरूपात असलेली पाईपाची प्लेट तोडणे गरजेचे आहे. नदीपात्रात जलपातळी वाढल्यावर काम करणे शक्य होणार नाही. त्यामुळे जलसाठा मर्यादित ठेवून धरण सांडव्याच्या उर्ध्व बाजूस बांध व पोहच रस्ता करून पाणीसाठा मुर्धा पातळीवर राहील. तो शेतकºयांना उपलब्ध करून देऊ.
- व्ही.एस.ठाकूर, उपकार्यकारी अभियंता, पाडळसरे धरण