धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्रासाठी हालचाली :उपवनसंरक्षक दिगंबर पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 01:06 PM2018-04-03T13:06:08+5:302018-04-03T13:06:08+5:30

‘लोकमत’ला सदिच्छा भेटीत दिली माहिती

 Movement for the Hazardous Tiger habitat: Deputy Conservator Digambar Pagar | धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्रासाठी हालचाली :उपवनसंरक्षक दिगंबर पगार

धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्रासाठी हालचाली :उपवनसंरक्षक दिगंबर पगार

Next
ठळक मुद्दे डोलारखेडा गावाच्या स्थलांतरासाठी प्रयत्न ...तर २०६ एकर जागेत गवतांचे कुरण जंगलावरील भार कमी करण्याचा प्रयत्न

जळगाव : डोलारखेडा परिसरात सद्यस्थितीत ६ वाघांचे अस्तित्व असून एका वाघिणीचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे या भागातील मानवी वावर कमी होण्यासाठी डोलारखेडा गावाने स्थलांतराची तयारी दर्शविली आहे. मात्र स्थलांतर करण्यासाठी हे क्षेत्र किमान ‘धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्र’ (क्रिटीकल टायगर हॅबिटॅट) अथवा अभयारण्य म्हणून घोषित होणे आवश्यक आहे. त्यासाठी वनविभागातर्फे प्रस्ताव देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी ‘लोकमत’ कार्यालयात दिलेल्या भेटीप्रसंगी दिली.
‘लोकमत’चेनिवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी झालेल्या चर्चेत पगार यांनी वनविभागाच्या कामाची तसेच भावी योजनांची माहिती दिली.
म्हणून ‘धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्रा’साठी प्रयत्न...
डोलारखेडा परिसरात वाघांचे अस्तित्व असल्याने व वाघाने हल्ला केल्याच्या घटनेनंतर लोकांनी स्वत:हूनच स्थलांतर करण्याची मागणी केली आहे. मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. जोपर्यंत अभयारण्य अथवा नॅशनल पार्क म्हणून हे क्षेत्र घोषित होत नाही, तोपर्यंत शासनाकडून स्थलांतरासाठी निधी उपलब्ध होऊ शकणार नाही. मात्र हे क्षेत्र अभयारण्य घोषित झाल्यास त्याच्या अनेक जाचक अटींच्या त्रासाला परिसरातील नागरिकांना सामोरे जावे लागेल. त्याऐवजी ‘धोकाग्रस्त व्याघ्र अधिवास क्षेत्र’ (क्रिटीकल टायगर हॅबिटॅट) म्हणून हे क्षेत्र घोषित झाले तरी स्थलांतराची प्रक्रिया करता येईल व तुलनेत जाचक अटी कमी असतील. त्यामुळे यासाठीचा प्रस्ताव पाठविण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती पगार यांनी दिली. सध्या मुख्यमंत्री कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्या प्रयत्नांनी हा परिसर वाघांसाठी संरक्षित वनक्षेत्र (टायगर कॉन्झर्वेशन रिझर्व्ह) म्हणून घोषित होऊ शकले. आता या जागेला सलग तारेचे कुंपण (मेटल फेन्सींग) किंवा सोलर कुंपण करण्याचा सुमारे ३३.२० लाखांचा प्रस्ताव शासनाला दिला आहे.
...तर २०६ एकर जागेत गवतांचे कुरण
उपवनसंरक्षक पगार म्हणाले की, डोलारखेडा परिसरातील नागरिकांनी स्वत:हून स्थलांतराची तयारी दर्शविली आहे. ते शक्य झाले तर जंगलाच्या अगदी मध्यवर्ती भागात असलेली सुमारे २०६ एकर मानवी वस्ती असलेली जमीन वनविभागाच्या ताब्यात येईल. त्या जागेत तृणभक्षी प्राण्यांसाठी गवताचे कुरण करता येईल. जेणेकरून मांसाहारी प्राण्यांना त्यांचे भक्ष्य जंगलातच उपलब्ध होईल.
मृत्यू झालेली वाघीण वृद्ध... उपवनसंरक्षक पगार म्हणाले की, डोलारखेडा परिसरात सद्यस्थितीत ४ मोठे वाघ व २ बछडे असे ६ वाघ आहेत. तर शेतात मृत्यू झालेल्या वाघीणीचे वय १६ ते १७ वर्षे होते. म्हणजेच ती वाघीण वृद्ध होती. तिच्या पायाला झालेली जखम भरली होती, त्यात ‘सेप्टीक’ झालेले नसल्याचे शवविच्छेदन अहवालात आढळून आले आहे. तसेच एक दात तुटला होता. मात्र वृद्धावर हल्ला याच वाघीणीने केला होता का? यासाठी जिथे हल्ला झाला होता, त्या ठिकाणावरून गोळा केलेले वाघाचे केस व मृत्यूझालेल्या वाघीणीचे केस डीएनए चाचणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवाल आल्यावरच हल्ला करणारी हीच वाघीण होती का? हे स्पष्ट होईल. तसेच या वाघीणीच्या मृत्यूच्या चौकशीसाठी अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. त्या चौकशीचा अहवाल आल्यावर त्यात कोणी दोषी आढळल्यास संबंधीतावर कारवाई केली जाईल.
जंगलावरील भार कमी करण्याचा प्रयत्न
डोलारखेडा वनक्षेत्र हे टायगर कॉन्झर्वेशन रिझर्व्ह म्हणून घोषीत झालेले असल्याने शासनाकडून मिळत असलेल्या निधीतून या जंगलातील पाणवठे कोरडे पडल्यास त्याजागी कृत्रीम पाणवठे तयार करणे, गवताची कुरण करणे, वनबंधारे, सिमेंट बंधारे बांधणे, इंटरप्रिटेशन सेंटर करणे, प्रत्येक गावात युवकांच्या मदतीने वनसंरक्षणाची चळवळ राबविणे, श्यामाप्रसाद मुखर्जी जनधन योजनेंतर्गत गावांना गॅस कनेक्शन तसेच इतर सुविधा पुरविणे आदी कामे करून जंगलावरील या नागरिकांचा भार कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पगार यांनी सांगितले.

Web Title:  Movement for the Hazardous Tiger habitat: Deputy Conservator Digambar Pagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.