वेतनाचा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:16 AM2021-03-17T04:16:39+5:302021-03-17T04:16:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लिपिक नसल्याने प्रशासकीय कामे होत नसल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परिचारिकांचा पगार रखडला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लिपिक नसल्याने प्रशासकीय कामे होत नसल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात परिचारिकांचा पगार रखडला आहे. यात काही परिचारिकांना तर गेल्या वर्षीचे कोविड कालावधीतील वेतन मिळाले नसल्याने अखेर येत्या काही दिवसांत हा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन करू, असा इशारा परिचारिकांनी दिला आहे.
कोरोना काळात थेट रुग्णांच्या संपर्कात राहून सेवा देण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्यानंतरही आम्हाला वेळेवर वेतन मिळत नसून फेब्रुवारीचे अद्याप स्टेटमेंट नाही, दर महिन्याच्या २० तारखेला पगार बिले तयार होतात. आमच्याकडे लिपिक नसल्याने अडचणी होत्या. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्याकडे तक्रार केल्यानंतर १ मार्च रोजी एक लिपिक नियुक्त करण्यात आला. मात्र, तोही कोरोनाबाधित आढळून आला. मात्र, पर्यायी व्यवस्था नसल्याने पुन्हा वेतनाशी संबंधित कामे अडकल्याचे आपत्कालीन विभागप्रमुख सुरेखा लष्करे यांनी सांगितले. वेतनाच्या मुद्द्यांवरून काही परिचारिकांच्या तक्रारी आल्यानंतर आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलणी केल्याचेही त्यांनी सांगितले. तातडीने हा विषय मार्गी लावावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.