भुसावळात विस्थापितांचे पुनर्वसनासाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 12:54 AM2020-02-17T00:54:24+5:302020-02-17T00:56:37+5:30
राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी शहरातील दीनदयाल नगरातील ९९ घरांचे अतिक्रमण महिनाभरापूर्वी पाडण्यात आले. मात्र अद्यापही शासनकडून विस्थापितांची दखल व पुर्नवसन करण्यात आले नाही. यामुळे विस्तापित नागरिकांनी दि.१६ रोजी रात्री आपापल्या तत्कालिन घरासमोर मेणबत्ती लावून घरांना श्रद्धांजली अर्पण केली.
भुसावळ, जि.जळगाव : येथील राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी शहरातील दीनदयाल नगरातील ९९ घरांचे अतिक्रमण महिनाभरापूर्वी पाडण्यात आले. मात्र अद्यापही शासनकडून विस्थापितांची दखल व पुर्नवसन करण्यात आले नाही. यामुळे विस्तापित नागरिकांनी दि.१६ रोजी रात्री आपापल्या तत्कालिन घरासमोर मेणबत्ती लावून घरांना श्रद्धांजली अर्पण केली.
शहरातील महामार्ग विस्तारीकरणाचे काम जोरात सुरू आहे. यात १६ जानेवारी रोजी महामार्गालगतच्या दीनदयाल नगरातील ९९ घरांवर शासनाकडून हातोडा मारण्यात आला. मात्र महिना उलटूनही विस्थापितांची दखल शासनाकडून घेण्यात आली नाही. यामुळे नागरिकांनी दि. १६ रोजी एकत्र येत आपापल्या घरांसमोर मेणबत्ती लावून घरांना श्रद्धांजली अर्पण केली. शासनाकडून जोपर्यंत पुर्नवसन होत नाही तोपर्यंत दर महिन्याच्या १६ तारखेला वेगवेगळ्या प्रकारचे दोन तासांचे तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे लोकसंघर्ष मोर्चाचे चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले.
तत्कालीन न. पा. प्रशासनाने आठवडे बाजारासाठी विस्थापित केलेल्यांसाठी दीनदयाल नगरची उभारणी केली होती. आता हायवेमध्ये त्याच विस्थापितांना स्वत:चा ७/१२ मिळून देण्याची प्रक्रिया शासनाने राबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी चंद्रकांत चौधरी, किरण मिस्तरी, आरती जोहरी, राजकुमार ठाकूर, संपत मेढे, निर्मला सुरवाडे, विजया मिस्तरी, सीमा चौधरी, अॅड. विजय तायडे, श्रीराम पाटील, सूरज वराडे, प्रकाश खडके, ज्योती खडके यांच्यासह विस्तापीत घरमालकांपैकी ८० घरमालक उपस्थित होते.