खड्डयांमध्ये वृक्षारोपण करीत शिवसेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 05:12 PM2017-10-17T17:12:56+5:302017-10-17T17:17:41+5:30
युवा सेनेच्या पदाधिकाºयांनी केले रास्ता रोको आंदोलन
आॅनलाईन लोकमत
नेरी ता.जामनेर, दि.१७ : रस्त्यांची मोठ्या प्रमाणात होत असलेली दुरवस्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष याचा निषेध करण्यासाठी शिवसेने मंगळवारी सकाळी म्हसावद चौफुलीवरील खड्डयांमध्ये वृक्षारोपण करीत अनोखे आंदोलन केले. यावेळी रास्ता रोको आंदोलन करीत शासनाचा निषेध नोंदविला.
शिवसेनेतर्फे म्हसावद चौफुलीवर वाहतूक अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मोठ्या खड्डयांमध्ये झाडांचे रोपटे लावून विधिवत पूजा आरती करीत जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. जवळपास एक तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
जळगाव-औरंगाबाद मार्गावर अनेक खड्डे पडलेले असून वाहन चालवणे कठीण झाले आहे. यामुळे अनेक वेळा लहान मोठे अपघात होत असतात. खड्डे बुजवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
म्हसावद चौफुलीपासून जामनेर ते नेरी हा १३ किमी रस्ता, जळगाव ते औरंगाबाद हा जळगाव हद्दीतील ६५ किमी चा रस्ता तर नेरी ते एरंडोल ३५ किमी चा रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्यांची अक्षरश: चाळणी झालेली असून खड्डे चुकवण्यासाठी वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आंदोलनात युवा सेना उपजिल्हाध्यक्ष अॅड.भरत पाटील , विद्यार्थी सेना तालुका संघटन विश्वजित मनोहर पाटील, अनिल चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, सुधाकर सोनवणे, अजय राजपूत, नाना सोनार, नीलेश खरे, शाम बोरसे, नेरी शहर अध्यक्ष रिजवान मण्यार, भूषण कोळी, अमोल कोळी, भूषण जंजाळे, कृष्णा सोनवणे, सागर पाटील, संतोष पारधी, सचिन बेलदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.