कोरोना महामारीच्या वर्षपूर्तीकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:15 AM2021-03-14T04:15:32+5:302021-03-14T04:15:32+5:30
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून यायला येत्या २८ मार्च रोजी वर्षपूर्ती होणार आहे. मात्र, त्या आधी कोरोनाने ...
जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून यायला येत्या २८ मार्च रोजी वर्षपूर्ती होणार आहे. मात्र, त्या आधी कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या महिनाभराच्या काळात दहा हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाची दशहत मात्र, कायम असल्याचे चित्र आहे.
ऑक्टोबरपासून १५ फेब्रुवारीपर्यंत काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा कोरोनाचे रुग्णवाढ समोर यायला सुरूवात झाली. गेल्या चार दिवसांपासून नियमीत ९५० पेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे यंत्रणेपुढील आव्हानेही वाढली आहे. यात गंभीर बाब म्हणजे गेल्या चार ते पाच दिवसांपासून मृतांचे प्रमाणही अधिक वाढले आहे. यात ५० वर्षांखालील रुग्णांचाही समावेश आहे. गेल्या वर्षभरात ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा साडेतीन महिन्यांचा काळ सोडला तर उर्वरित ९ महिन्यांमध्ये जिल्ह्यातील ६८ हजारांपेक्षा नागरिकांना बाधा केली आहे. २८ मार्च २०२० रोजी जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आला होता.
६८,६६२ कोरोनाचे एकूण रुग्ण
६०५१७ बरे झालेले रुग्ण
१४३२ एकूण कोरोना बळी
६७१३ सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण
२५ कोविड सेंटर्सची संख्या
असे वाढले रुग्ण
मार्च : ०१
एप्रिल : ३६
मे : ७०३
जून : २८१०
जुलै : ७३७३
ऑगस्ट : १६२०३
सप्टेंबर : २००४८
ऑक्टोबर : ५०१३
नोव्हेंबर : १३६८
डिसेंबर : १३६०
जानेवारी : १११३
फेब्रुवारी : ३८४४
१२ मार्चपर्यंत : ७७८४
कोविड केअर सेंटर पुरेसे
- कोरोनाचा संसर्ग वाढल्याने, ॲक्टीव्ह केसेसची संख्या वाढल्याने एक एक कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. पुन्हा बेड वाढविण्याचे प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. यात आता ग्रामीण भागात ११ कोविड केअर सेंटर व ११ डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यात आले आहेत.
- जीएमसीत कोरोना कक्ष फुल्ल झाल्याने आता ७ व ८ क्रमांकाच्या कक्षात रुग्ण दाखल केले जाणार आहे. यासह अन्य काही कोविड केअर सेंटरही सुरू करण्यात येणार आहेत. सद्या पुरेसे बेड उपलब्ध असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
रेमडेसीव्हीर पुरेसे रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा साठा नुकताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राप्त झाला आहे. यासह कोरोनासाठी आवश्यक औषधींचा पुरेसा साठा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना लागणाऱ्या औषधीही पुरेशा आहेत, गंभीर रुग्णांसाठीचा साठा जीएमसीत उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.
पहिला रुग्ण
- पहिला रुग्ण हा मेहरूण येथील रहिवासी असून मार्च २०२० मध्ये हा रुग्ण मुंबईहून रेल्वेने जळगावात आला होता.
- सुरूवातीचे काही दिवस या रुग्णाला लक्षणे जाणवली मात्र, त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. त्यानंतर अधिक त्रास झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते.
- २८ मार्च रोजी रात्री साडे आठ वाजता या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.
- १५ एप्रिल रोजी या रुग्णाला बरा झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले होते.