डिनसह सात जण निलंबित खासदार पाटील यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 11:44 AM2020-06-11T11:44:27+5:302020-06-11T11:44:42+5:30
तक्रारीनंतर कारवाई ? : घृणास्पद प्रकार असल्याची टीका
जळगाव : कोविड रुग्णालयात बाधीत महिलेचा मृतदेह आठवडाभरानंतर स्वच्छतागृहात आढळून येणे ही बाब अत्यंत घृणास्पद असल्याची टीका खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे़ या प्रकरणात वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ़ तात्याराव लहाने यांनी तातडीने अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांच्यासह अधीक्षक व प्राध्यापक अशा सात जणांना निलंबित करण्यात आल्याचा दावा खासदारांनी केला आहे़
महिला बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर महिलेचा पुतण्या आपल्याला येऊन भेटला होता़ मला वृद्धेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मी तात्काळ वैद्यकीय शिक्षणमंत्री व शिक्षण संचालक डॉ़ तात्याराव लहाने यांच्याकडे कारवाईची मागणी केली़
त्यांच्याशी दुरध्वनीवरून झालेल्या बोलण्यानुसार अधिष्ठातांसह सात जणांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे़ पर्यायी व्यवस्था म्हणून कोल्हापूर येथील अधिष्ठाता रामानंद यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही उन्मेष पाटील यांनी म्हटले आहे़
जिल्हा शल्यचिकित्सक, अधिष्ठाता व जिल्हाधिकारी यांनी इगो बाजूला ठेवून तात्काळ १५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियुक्त करावे, अन्यथा आपण जावून बसू, असा इशारा उन्मेष पाटील यांनी दिला आहे़