अमळनेर येथील एकावर एमपीडीएची कारवाई; येरवडा तुरुंगात रवानगी
By चुडामण.बोरसे | Published: August 1, 2023 01:38 PM2023-08-01T13:38:22+5:302023-08-01T13:38:43+5:30
सहा दखलपात्र गुन्हे तर एक अदखलपात्र गुन्हा त्याच्यावर दाखल आहे.
अमळनेर (जि.जळगाव) : शहरात दंगली आणि तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपीविरुद्ध अमळनेर पोलिसांनी एमपीडीएची कारवाई केली. त्याची पुणे येथील येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
विशाल दशरथ चौधरी ( वय २७) असे या आरोपीचे नाव आहे. २०२३ या वर्षात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पाच एमपीडीएच्या कारवाई अमळनेरात झाल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिली. अमळनेर शहरातील भोईवाडा भागातील विशाल चौधरी हा शहरातील विविध दंगलीत सहभागी होऊन दहशत निर्माण करत होता. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, जबरी लूट , तलवार घेऊन दहशत निर्माण करणे असे सहा दखलपात्र गुन्हे तर एक अदखलपात्र गुन्हा त्याच्यावर दाखल आहे.
विशाल विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करूनदेखील त्याच्या वर्तणुकीत बदल झाला नव्हता. यासाठी पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी हेकाॕ.किशोर पाटील व सिद्धांत शिसोदे यांच्या मदतीने एमपीडीए प्रस्ताव तयार केला. अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, डीवायएसपी सुनील नंदवाळकर यांचे मार्गदर्शन घेऊन प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला.
प्रस्तावाची मंजुरी मिळताच पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोलीस दीपक माळी ,रवींद्र पाटील, शरद पाटील यांनी त्याला १ ऑगस्ट रोजी सकाळी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे , हेकॉ. कैलास शिंदे , घनश्याम पवार , सुनील पाटील यांनी आरोपी विशाल चौधरी याला पुणे येथील येरवडा तुरुंगात स्थानबद्ध करण्यासाठी नेले.