जळगाव जिल्ह्यातील दांडीबहाद्दर अधिका-यांवर खासदारांचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 03:53 PM2018-02-17T15:53:41+5:302018-02-17T21:33:18+5:30
रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीबाबत अधिका-यांना गांभीर्य नसल्याने नाराजी व्यक्त करीत रद्द केली बैठक
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि. १७ - जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीला जिल्ह्यातील प्रमुख अधिका-यांनी दांडी मारल्याने शनिवारी आयोजीत करण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली. अधिकारीच अनुपस्थित असल्याने रस्ते, अपघात व वाहतुकीच्या समस्या कोणापुढे मारणार? असा प्रश्न लोकप्रतिनिधींनी उपस्थित करीत ही बैठक रद्द करण्याचा सूचना दिल्यानंतर, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी बैठक रद्द झाल्याची माहिती दिली.
जिल्ह्यातील अपघातांची माहिती, रस्ता सुरक्षा विषयक अंमलबजावणीची माहितीसह वाहतुकीची समस्या, या विषयांवर तोडगा काढण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीचे आयोजन शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. बैठकीला समितीचे अध्यक्ष खासदार ए.टी.पाटील, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे व महापौर ललित कोल्हे उपस्थित होते. मात्र जे प्रमुख अधिकारी या बैठकीला उपस्थित असणे गरजेचे होते. त्याच अधिका-यांनी या बैठकीला महत्व न देता पाठ फिरविल्याने खासदार ए.टी.पाटील व आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी संताप व्यक्त केला.