कोरोना ‘लॅब’च्या विश्वासार्हतेवरच खासदारांनी उपस्थित केला प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 12:21 PM2020-06-14T12:21:56+5:302020-06-14T12:23:18+5:30
निगेटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांना होतोय पुन्हा त्रास
जळगाव : कोरोनाच्या चाचणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या प्रयोगशाळेकडून (लॅब) ज्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले, त्या रुग्णांना त्रास होत असल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचा दावा खासदार उन्मेष पाटील यांनी केला आहे. या प्रयोगशाळेत योग्य तंत्राचा वापर होत आहे की नाही या विषयी आपण तज्ज्ञांकडून माहिती घेणारआहोत आणि भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेकडे (आयसीएमआर) लॅबविषयी तक्रारही करणार असल्याचे खासदार पाटील म्हणाले.
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर जळगावात घेण्यात आलेले नमुने (स्वॅब) पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. त्यानंतर धुळे येथे लॅब सुरू झाली व तेथे हे नमुने पाठविण्यात येऊ लागले. मात्र रुग्णसंख्या वाढतच असल्याने जळगावात लॅब सुरू करण्याची मागणी होऊ लागली व त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात लॅब सुरू करण्यात आली.
जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता खासदार उन्मेष पाटील यांनी या प्रयोगशाळेच्या कार्यपद्धतीवरच शंका उपस्थित केली आहे. या प्रयोगशाळेतील अहवालाबाबत आपल्याकडे तक्रारी आल्या असून ज्या रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले त्यांना पुन्हा त्रास होत असल्याचे खासदार पाटील म्हणाले. यात उदाहरण म्हणून त्यांनी जामनेर व पारोळा येथील रुग्णांच्या अहवालाचा संदर्भ दिला.
अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर अशा रुग्णांना घरी सोडण्यात आले व पुन्हा त्यांना अधिक त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे खासदार म्हणाले. अहवाल व्यवस्थित आले तर रुग्णांवर उपचारही करता आले असते. मात्र जर प्रयोगशाळेचे अहवालच संशयास्पद येत असतील तर रुग्णांवर उपचार तरी कसे होणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणाची आपण गंभीर दखल घेतली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या या प्रयोगशाळेची सर्व माहिती आपण मागविली असल्याचे खासदार म्हणाले. लॅबला मान्यता दिली असली तर तेथे योग्य तंत्राचा वापर होत आहे की नाही, याची तज्ज्ञांच्या मदतीने खात्री करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.