कर्नाटकचे श्री विठ्ठलस्वामी आणि श्री दगा महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:21 PM2017-10-11T16:21:31+5:302017-10-11T16:23:04+5:30
‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘खान्देशातील संतांची मांदियाळी’ या सदरात सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी कर्नाटकचे श्री विठ्ठलस्वामी आणि श्री दगा महाराज यांच्या सांगितलेल्या आठवणी.
श्री विठ्ठलस्वामींचे आगमन कर्नाटकाहून झाले. नंदुरबारच्या द्वारकाधीशाच्या मंदिराशी त्यांचे नाव संबध्द आहे. महाराजांचे पूर्वज साधारणपणे 1510 सालच्या जवळपास समुद्रमार्गे दक्षिणेकडे प्रयाण करून उत्तर कर्नाटक इलाख्यातमील हनुमट्टा या गावी येऊन पोहोचले. स्वामींचे पूर्वज श्री शांताप्पा शानभाग अकोला तालुक्यातील अघनाशिनी नदीच्या काठावर वसलेल्या कोडकनी ग्रामी स्थायिक झाले. जमीनदार वृत्ती असूनही अत्यंत सदाचरणी, वैदिक धर्मानुयायी आणि परोपकारी असे होते. अनंत हे विठ्ठलस्वामींचे वडील होत. दुर्मती नाम संवत्सरात 1862 साली त्यांचा जन्म झाला. गृहत्याग करून स्वामींनी गोकर्ण महाबळेश्वर गाठले. तिथे तपाचरण आणि गं्रथाध्ययन केले. तीर्थयात्रा केल्या. शहादे येथे आले. स्वामींचा पत्रव्यवहार मुख्यत: कानडीतून चालायचा. विठ्ठलस्वामींचे सोनगीर येथेही येणेजाणे होते. स्वामींचे जीवन विलक्षण प्रत्ययकारी होते. भरपूर व्यासंग, उत्तम कीर्तनकला, निरुपणाची हृदयस्पर्शी शैली, शास्त्रीय गायनाची सहज संगती, मनाची पकड घेण्याची अपूर्व क्षमता असलेले निरुपण कौशल्य, कडकडीत वैराग्य, अखंड नामस्मरण आणि अन्नदानावरचा विशेष भर स्वामींच्या जीवन आणि कार्याचे विशेष सांगता येतील. भक्तीभावनेने तुडुंब भरलेल्या स्वामींची कीर्ती सर्वत्र पसरली. 1921 साली चैत्र वद्य सप्तमी रोजी स्वामींनी ईहलीला संपवली. नंदुरबारच्या द्वारकाधीशाच्या मंदिरात स्वामींची समाधी आहे. खान्देशच्या संत मंडळात आपल्या रामनाम स्मरणाच्या यज्ञकार्याने आणि अखंड सेवा भावनेने सदैव स्मरणात राहतील, असे नंदुरबार जिल्हय़ातील चौपाळे येथील श्री दगा महाराज उपाख्य ब्रrाचैतन्य महादेव महाराज यांनी रामधूनचा प्रचार करून या परिसराला एका अनोख्या जीवनदर्शनाची दिशा दाखवली आणि मौखिक धर्माची दीक्षा दिली. महाराजांचे बालपण कुकुरमुंडे येथील मठातील सेवाकार्यात गेले. संतोजी महाराजांची अपार सेवा त्यांच्या हातून घडली. आपल्या सहज विनम्र स्वभावामुळे ते जीवनाच्या अंतिम शोधयात्रेच्या निमित्ताने तिथून निघून गेले. अनेक ठिकाणी आशावाद जागवला. बालपणीच मातृपितृछत्र हरपले होते. परिस्थिती अतिशय दैन्याची, दारिद्रय़ाची होती. अज्ञान सोबतीला होते. अशा वातावरणातून वाट काढत त्यांनी आपल्या आयुष्याचा ऊध्र्वमुखी अध्याय लिहिला. नेपाळी बाबांचा त्यांना आशीर्वाद लाभला होता. संतोजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर मोठय़ा जड अंत:करणाने दगा महाराजांनी पदयात्रा करत तीर्थाटन करण्याचा संकल्प केला. देश बघितला. जनजीवन न्याहाळले. यातून साधूसंत दर्शनाचा सुयोग आला. हैद्राबाद येथील जमनादास बापूंनी चेतनाशक्ती प्रदान केली. थोर संतांच्या सत् संकल्पाने महाराज भारावले. यातून प्रभातफेरीची योजना सुरू झाली. त्यांच्या प्रेरणेने गावागावातून ब्राहय़मुहूर्ती प्रभातफे:या निघू लागल्या होत्या. गंगा, यमुना, तापी, नर्मदा यासारख्या पावन नद्यांच्या काठावर वसून त्यांनी आपल्या संकल्पानुसार तपाचरण केले. आपल्या सुनियोजित साधनेला पूर्णत्वाप्रत नेले. प्रभातफेरीच्या निमित्ताने आकाश दर्शन व्हायचे. यातून पर्यावरणाचे नेमके भान जागवता आले. पहाटेच्या समयी ऋषिवृंद गंगास्नानाला जात असल्याचे त्यांचे निवेदन होते. नाम संकीर्तन, जीर्णोध्दार, मंगल कार्यालये, धर्मशाळा, नव्या मंदिराची मुहूर्तमेढ, सत्पुरुषांच्या भागवत कथा वा रामायण प्रवचनांचे आयोजन या कामात ते गढून गेलेत. नर्मदा तटी भजन आणि भोजन यासाठी आशा येथे आश्रमाची स्थापना केली. अतिशय निरिच्छपणे कार्य करणारे असे दगा महाराज कमालीचे अपरिग्रही होते. निरहंकारी, स्वच्छ, रचनात्मक मन आणि कार्य करणारे असे दगा महाराज या परिसरात सहजच जनप्रिय झाले. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या स्वाध्याय कार्यप्रक्रियेतला त्यांचा मौन मूक वाटा केवळ पूजनीय स्वरुपाचाच होता. दगा महाराज हे संत परंपरेतले एक अद्भुत असे रत्न होते. शिक्षण नाही, भाषा ज्ञान नाही, पठण नाही, प्रवचन शैली नाही, काहीही नाही पण अंतरंगी रमलेले विलक्षण संवेदनशील मन आणि पांडुरंगध्यानी रंगलेली मुद्रा हे त्यांचे वैशिष्टय़ होते. एक हंबर आणि आर्त हृदय त्यांची ओळख होती. डोंगरे शास्त्री, पांडुरंगशास्त्री आठवले, मुरारी बापू यासारख्या संतांनी एकमुखाने दगा महाराज यांच्या कार्याची मुक्तपणे प्रशंसा केली होती. चौपाळे येथे आज रामदेव बाबांचे मंदिर आहे. रामधून आहे. प्रकाशा येथे रामरोटीची व्यवस्था आहे. हे सारे कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता आणि मुख्य म्हणजे महाराजांच्या गैरहजेरीतही आजही सुरू आहे हे विशेष म्हणावे लागेल.